NCERT, नवी दिल्ली मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रयास (PRAYAAS - Promotion of Research Attitude In Young And Aspiring Students) या योजनेबद्दल माहिती देण्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे च्या संचालकांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ :
१. DESM, NCERT, नवी दिल्ली यांचे दि. १४/०८/२०२५ चे पत्र
२. मा. संचालक, प्रस्तुत कार्यालय यांचे निर्देश दि. २५/०८/२०२५
उपरोक्त विषयांन्वये संदर्भ क्र. १ व २ नुसार विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, आणि कल्पनाशक्ती आणि जिज्ञासू वृत्ती या नैसर्गिक प्रवृत्ती असतात, त्या विद्यार्थ्यांना संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास व त्या प्रत्यक्ष जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपयोगात आणण्यास महत्त्वाच्या ठरतात. मुलांची सृजनशीलता सम्माजातील विविध आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी उपयोगात आणली जाऊ शकते. त्यांना सामाजिक समस्या हाताळण्याच्या आणि नवनवीन ज्ञाननिर्मितीच्या संधी दिल्या जाणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे विद्यार्थ्यांमध्ये मौलिक विचारसरणी प्रोत्साहित करण्याची, भारताला जागतिक ज्ञानसत्ता बनविण्याची व रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याची गरज अधोरेखित करते.
विद्यार्थ्यांच्या या संशोधक वृत्तीला जोपासण्यासाठी प्रयास (PRAYAAS Promotion Of Research Attitude In Young And Aspiring Students) ही योजना विज्ञान व गणित शिक्षण विभाग (DESM), NCERT, नवी दिल्ली यांचेमार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेद्वारे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देऊन् STEAM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कला आणि गणित) शिक्षणाचे वास्तव जीवनातील महत्त्व समजून घेण्याची संधी आणि त्यांच्या सर्जनशील कल्पनाशक्तीला चालना दिली जाते. तसेच, या योजनेतून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर आपली वैज्ञानिक क्षमता प्रदर्शित करण्याची संधीही मिळणार आहे.
या अनुषंगाने, विद्यार्थी विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व उच्च शिक्षण संस्था (HEIs) जसे की भारतीय विद्यापीठे, महाविद्यालये, सार्वजनिक उपक्रम (PSUS), सरकारी किंवा स्वयंसेवी संशोधन व विकास प्रयोगशाळा, उद्योग आर्दीच्या तज्ज्ञांच्या सहकार्याने प्रकल्प प्रस्ताव तयार करतील. निवड झाल्यास, त्या प्रकल्पाद्वारे ते STEAM शिक्षणाच्या विविध पैलूंचा वापर करून संशोधन करतील. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल, नवीन कल्पना सुचतील, संशोधन प्रकल्प प्रस्ताव तयार करता येईल व पुढे त्याची अंमलबजावणीही करता येईल.
विद्यार्थी व शिक्षक या प्रक्रियेतील मार्गदर्शनाद्वारे नवनवीन कल्पना व नवोपक्रम विकसित करण्यास प्रेरित होतील, तसेच या नवकल्पना स्थानिक किंवा जागतिक समकालीन समस्यांवर उत्तम उपाय शोधण्यासाठी कशा उपयुक्त ठरू शकतात हेही ते तपासतील. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पना शिकवण्याचा नवा व अभिनव मार्ग उपलब्ध करून देईल आणि त्यांच्या सर्वांगीण विकासास हातभार लावेल. या योजनेची खालील उद्दिष्टे आहेत.
शालेय विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संशोधन आणि शोधन प्रक्रिया विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करणे.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि पुराव्यावर आधारित विज्ञान प्रक्रिया-कौशल्ये, नाविन्यपूर्णता आणि सर्जनशीलता निर्माण करणे.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिकरित्या किंवा गटांमध्ये संशोधन आणि शोधन क्षमता वाढवणे.
सामाजिक समस्या सोडवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून समस्या सोडवण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करणे.
शालेय-शिक्षण आणि उच्च शिक्षण यांच्यात दुवा प्रस्थापित करणे, विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक विचार आणि कौशल्य विकसनासाठी चालना देणे.
स्टार्ट अप सुरू करण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची क्षमता वैज्ञानिक प्रक्रियेद्वारे विकसित करणे.
PRAYAAS या योजनेअंतर्गत मूळ वैज्ञानिक संकल्पना/क्षेत्रावर संशोधन किंवा शोधन करण्यासाठी खालील विषयावर प्रकल्प/प्रस्ताव मागविण्यात येत आहेत,
स्थानिक समस्येची ओळख करून तिचा अभ्यास करणे
एखाद्या स्थानिक समस्येमागील वैज्ञानिक कारणांचा शोध घेणे
कोणत्याही समस्येवर वैज्ञानिक उपाय शोधण्याचा प्रयत्न करणे
वैज्ञानिक ज्ञाननिर्मितीस उद्दिष्ट ठेवून कोणत्याही कल्पना/चिंतन/संकल्पनांवर कार्य करणे.
PRAYAAS या योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थी व शिक्षक उच्च शिक्षण संस्था (HEI) मधील प्राध्यापक/तज्ज्ञ यांच्या सहकार्याने एखाद्या समस्येचा तपास करतील व त्यावर आधारित संशोधनात्मक उपाय शोधतील, जे विज्ञान शिक्षणासाठी किंवा पर्यावरण संवर्धनासाठी उपयुक्त ठरतील.
या प्रकल्प प्रस्तावासाठी जास्तीत जास्त दोन विद्यार्थी आणि एक शिक्षक व मार्गदर्शक म्हणून कोणत्याही उच्च शिक्षण संस्थे (HEI) मधील एक प्राध्यापक/तज्ज्ञ यांची एक गट तयार करावा.
PRAYAAS मध्ये विद्यार्थी आपल्या शिक्षकांच्या सल्ल्याने विविध संशोधन क्षेत्रांमधून एखादी मूळ (Original Idea) कल्पना निवडतील.
शाळेजवळील उच्च शिक्षण संस्था (HEI) मधील तज्ज्ञ संशोधनासाठी लागणारी साधने व तंत्रे वापरण्यासाठी मदत करू शकतात.
HEI मधील प्राध्यापक तज्ज्ञ व शालेय शिक्षक PRAYAAS विद्यार्थ्यांना संशोधनाच्या प्रत्येक टप्प्याची आवश्यक माहिती व मार्गदर्शन योग्य वेळी उपलब्ध करून देतील.
सदर योजनेमध्ये सहभागी होऊन अंतिम निवड झालेल्या गटास संशोधन कार्य पूर्ण करण्यासाठी रु ५००००/- निधी दिला जाणार आहे. तसेच संबंधित संशोधनास NCERT, नवी दिल्ली च्या वेबसाईटवर प्रसिद्धी दिली जाणार आहे.
प्रयास या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते आणि ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख दि. ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत होती. तथापि, प्रयास योजना २०२५-२६ अंतर्गत ऑनलाइन अर्ज मागवण्याची तारीख दि.५ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ०५:३० पर्यंत वाढविण्यात आली आहे. या तारखेनंतर आणि वेळेनंतर प्राप्त झालेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत.
प्रयास योजना २०२५-२६ मध्ये सहभागी होण्यासाठी मार्गदर्शक सूचना
https://ncert.nic.in/desm/pdf/PRAYAAS202526.pdf येथे उपलब्ध आहेत. या शिवाय अधिक माहितीसाठी NCERT, नवी दिल्ली यांच्या वेबसाईटला भेट द्यावी. योग्यरित्या भरलेले अर्ज एका (०१) सिंगल पीडीएफमध्ये या prayaas2526@gmail.com वर दि.५ सप्टेंबर २०२५ पूर्वी सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत पाठवता येतील. राज्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत प्रयास या योजनेसंदर्भात माहिती पोहोचावी व विद्यार्थी सहभाग वाढावा यासाठी आपल्या स्तरावरून कार्यवाही करावी.
(डॉ. कमलादेवी आवटे)
सहसंचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे- ३०
संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments