शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना शासन आदेश. २८/०७/२०२५

 महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 28 जून 2025 रोजी शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना शासन निर्णय द्वारे निर्गमित केल्या त्या पुढील प्रमाणे. 


प्रस्तावना :-

सध्याच्या डिजीटल युगात सोशल मिडियाचा (समाज माध्यम) वापर माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी, समन्वय, संवाद साधण्यासाठी तसेच लोकसहभाग वाढविण्यासाठी करण्यात येतो. सोशल मिडिया ही व्यापक संकल्पना असून त्यामध्ये सोशल नेटवकींग साईट्स (उदा. फेसबुक, लिंक्डईन), मायक्रोब्लोगींग साईट्स (उदा. ट्विटर, एक्स), व्हिडीओ शेअरींग प्लॅटफॉर्म्स (उदा. इंस्टाग्राम, युट्युब), इंस्टंट मेसेजिंग अॅप्स (उदा-व्हॉटस्अॅप, टेलिग्राम) आणि कोलंबोरेटिव्ह टूल्स (उदा-विकीज, डिस्कशन फोरम्स) इ. माध्यमांचा समावेश होतो.

मात्र या माध्यमांचा सहज आणि सोपा वापर करता येणे, क्षणात जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात माहिती पाठविता येणे आणि एका क्लिकवर अनेक लोकांपर्यंत पोहोचणे यामधून काही धोके सुध्दा निर्माण झालेले आहेत. जसे की, गोपनीय माहितीचा प्रसार, खोटी व भ्रामक माहिती पसरवणे, जाणूनबुजून अथवा चुकून पसरविलेली माहिती नष्ट करण्यास मर्यादा असणे. तसेच शासकीय धोरणांबाबत अथवा कोणत्याही राजकीय घटना व्यक्ती यांचेबाबत शासकीय सेवा नियमांचे उल्लंघन करुन प्रतिकूल अभिप्राय नोंदविणे, इ. प्रकारे सोशल मिडियाचा अनुचित वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्तणूकीबाबत महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ तयार करण्यात आले आहेत. सदर नियम राज्य शासकीय कर्मचा-यांच्या सोशल मिडियाच्या वापराबाबतही लागू होतात. वर्तणूक नियमांचा भंग केल्यास संबंधित कर्मचारी शिस्तभंगविषयक कारवाईस पात्र ठरतो. या पार्श्वभूमीवर सोशल मिडियाच्या वापराबाबत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेतः-


शासन परिपत्रक :-

१) प्रस्तुत मार्गदर्शक सूचना खालील अधिकारी / कर्मचाऱ्यांना लागू राहतील :-

अ) महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील अधिकारी/कर्मचारी

(प्रतिनियुक्तीने तसेच करारपध्दतीने, बाह्यस्त्रोताद्वारे नियुक्त केलेल्या अधिकारी / कर्मचा-यांसह)

ब) स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे आणि सार्वजनिक उपक्रम यामधील अधिकारी/कर्मचारी (प्रतिनियुक्तीने तसेच करारपध्दतीने, बाह्यस्त्रोताद्वारे नियुक्त केलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांसह)

२ ) राज्य शासनाच्या किंवा भारतातील अन्य कोणत्याही शासनाच्या चालू किंवा अलिकडच्या धोरणावर किंवा कृतीवर प्रतिकूल टीका करु नये,

३) शासकीय कर्मचाऱ्याने सोशल मिडीयाचा वापर अत्यंत जाणीवपूर्वक व जबाबदारीने करावा.

४) शासकीय कर्मचाऱ्याने त्याचे वैयक्तिक व कार्यालयीन सोशल मिडिया खाते (अकाऊंट) हे दोन्ही स्वतंत्र ठेवावेत.

५) केंद्र / राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट, अॅप, इ. चा वापर करु नये.

६) शासनाद्वारे प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने शासकीय योजना, उपक्रम इत्यादींच्या प्रसार व प्रचारासाठी तसेच लोकसहभागाकरीता केवळ शासकीय तसेच अधिकृत माध्यमांचा वापर करता येईल.

७) कार्यालयांतर्गत कामकाजाबाबत समन्वय / संपर्क साधण्यासाठी व्हॉटस्अॅप, टेलिग्राम, इ. मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल.

८) शासनाच्या / विभागाच्या योजना/ उपक्रम यांच्या यशस्विततेच्या अनुषंगाने अधिकारी कर्मचारी यांनी सांधिक प्रयत्न केल्याबाबत सोशल मिडियावर मजकूर लिहीता येईल मात्र त्यामुळे स्वयंप्रशंसा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

९) अधिकाऱ्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शासकीय कामाबाबत मजकूर पोस्ट करता येईल मात्र त्याद्वारे स्वयंप्रशंसा होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

१०) वैयक्तिक सोशल मिडिया अकाऊंटवर केवळ प्रोफाईल फोटो वगळता, आपल्या शासकीय पदनामाचा, लोगो, वर्दी / गणवेष तसेच शासकीय मालमत्ता जसे की वाहन, इमारत, इत्यादींचा वापर फोटो / रिल्स/व्हीडीओ अपलोड करतांना टाळावा.

११) आक्षेपार्ह, द्वेषमूलक, मानहानीकारक तसेच भेदभाव उत्पन्न होणारे मजकूर, इ. शेअर / अपलोड / फॉरवर्ड करु नयेत.

१२) प्राधिकृत केल्याशिवाय तसेच पूर्व मंजूरीशिवाय कोणतेही गोपनीय दस्तऐवज, शासकीय तसेच कार्यालयीन कागदपत्रे, अंशतः तसेच पूर्ण स्वरुपात शेअर / अपलोड / फॉरवर्ड करु नयेत.

१३) बदली झाल्यानंतर कार्यालयीन सोशल मिडिया अकाऊंट योग्य प्रकारे हस्तांतरीत करावे.

१४) ज्या कर्मचाऱ्याकडून उपरोक्त मार्गदर्शक सूचनांचा भंग होईल त्याचेवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ तसेच अन्य संबंधित नियमानुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल.

सदर परिपत्रक शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०७२८१८११४८७५०७ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


SUCHITA MOHAN

MAHADIK


(सुचिता महाडिक)

 सह सचिव, महाराष्ट्र शासन


१. मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,

२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव / सचिव,

संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.