शाळा सोडल्याच्या कारणास्तव अभिलेख बदल नाकारता येत नाही!
स्पष्ट कारण असल्यास प्रस्तुत प्रकरणात फेरविचार करण्याचे खंडपीठाचे आदेश!
केवळ शाळा सोडल्याच्या कारणास्तव शालेय अभिलेखात बदल नाकारता येणार नाही, असे स्पष्ट मत नोंदवीत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी बदल नाकारणारा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचा आदेश रद्द केला. अधिकच्या पुराव्यांची शहानिशा करून, स्पष्ट कारण असेल तर उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाच्या जनाबाई ठाकूर विरुद्ध राज्य शासन या निवाड्यानुसार प्रस्तुत प्रकरणात गुणवत्तेआधारे फेरविचार करून सहा आठवड्यांत निर्णय घेण्याचा आदेश खंडपीठाने दिला आहे.
याचिकाकर्ती शेख तय्यबा रियाज हिने याचिकेत म्हटल्यानुसार छत्रपती संभाजीनगरमधील सेंट लॉरेन्स या शाळेतून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने किरगीज रिपब्लिक येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. तिच्या प्राथमिक व माध्यमिक सोडल्याच्या प्रमाणपत्रात शाळा तसेच एस.एस.सी. व एच.एस.सी. प्रमाणपत्रात तिची जन्मतारीख ५ मे २००१ अशी नोंदविलेली होती; परंतु छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या जन्म-मृत्यू रजिस्टरमध्ये तिची जन्मतारीख ४ मे २००१ अशी नोंदविलेली आहे. वरील दोन अभिलेखातील जन्मतारखेच्या तफावतीमुळे तय्यबा हिला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. म्हणून मनपाच्या नोंदीनुसार जन्मतारखेत बदल करण्याची विनंती याचिकाकर्तीने शाळेच्या प्राचार्याना केली. प्राचार्यानी वरीलप्रमाणे बदल करण्याची शिफारस शिक्षणाधिकारी यांना केली.
शिक्षणाधिकारी यांचे नियमावर बोट
शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जाचा माध्यमिक शाळा संहितेच्या नियम २६.४ नुसार विचार करता येणार नाही. सबब, तय्यबाच्या जन्मतारखेत बदल करता येणार नाही, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी १७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्राचार्यांना कळविले. म्हणून विद्यार्थिनीने अॅड. विठ्ठलराव सलगरे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली होती. केवळ शाळा सोडल्याच्या कारणास्तव शालेय अभिलेखात बदल नाकारता येणार नाही, अशी तरतूद माध्यमिक शाळा संहितेत नाही. उलट स्पष्ट कारण असेल तर कलम २६.३ आणि २६.४ नुसारसुद्धा आवश्यक बदल करता येतो, असे अॅड. सलगरे यांनी निदर्शनास आणून दिले.
उच्च न्यायालयाचा आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments