शिक्षक व अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणेबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
संदर्भः
१. राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२०.
२. राज्य अभ्यासक्रम आराखडा-२०२४.
३. शासननिर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.१०/एसडी-६ मंत्रालय, मुंबई दि. १५ मार्च २०२४ (SQAAF)
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये, राज्यातील राज्य मंडळाच्या अधिनस्त असणाऱ्या सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, DIET मधील अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये शैक्षणिक, प्रशासकीय कौशल्य वृद्धिंगत करणे, त्यांच्यात समन्वय, सहकार्य व स्पर्धात्मकतेची भावना निर्माण करणे तसेच त्यांच्या डिजिटल, भाषिक व सादरीकरण कौशल्यांना चालना देण्याच्या उद्देशाने तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून करण्यात येत आहे.
या स्पर्धांच्या आयोजनासाठी निकष आणि नियमावली तयार करण्यात आली आहे. सदर स्पर्धा ह्या एकूण ४२ विषयांवर आधारित असणार आहेत. नमूद स्पर्धांचे निकष व नियमावली बाबतची सविस्तर माहिती शिक्षक व अधिकारी/कर्मचारी स्पर्धा मार्गदर्शिका ह्या पुस्तिकेत देण्यात आलेली आहे. शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी सदर पुस्तिकेत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करावे. सदर पुस्तिका ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ह्या संस्थेच्या www.maa.ac.in ह्या संकेतस्थळावर उपयुक्त या टॅबवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
शिक्षक व अधिकारी/कर्मचारी स्पर्धा नियोजन सोबत जोडले आहे.
शिक्षक व अधिकारी / कर्मचारी स्पर्धा- सर्वसाधारण सूचना
१. सर्व स्पर्धा पुढील तीन स्तरावर आयोजित करण्यात येतील.
१. तालुका स्तर २. विभाग स्तर ३. राज्यस्तर
२. स्पर्धेचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी शिक्षणाधिकारी (प्राथ.) व शिक्षणाधिकारी (माध्य.) यांचे समन्वयाने करावे.
३. तालुका स्तरावर सर्व स्पर्धांचे आयोजन स्थानिक जिल्हा करेल. विभागनिहाय स्पर्धेचे आयोजन विभागस्तर आयोजक जिल्हा स्वतःच्या जिल्ह्यात पुढीलप्रमाणे करेल. तसेच राज्यस्तरावरील स्पर्धांचे आयोजन आयोजक जिल्हा स्वतःच्या जिल्ह्यात करेल.
४. स्पर्धेच्या आयोजनासाठी सर्व आयोजक व स्थानिक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांनी शिक्षक शिक्षण (TE) किंवा नियमोचित इतर लेखाशीर्ष अंतर्गत प्राप्त निधीतून स्पर्धेच्या आयोजनाचा विहित नियमावलीप्रमाणे खर्च भागवावा.
५. प्रत्येक स्पर्धेत केंद्रातील किमान एका शिक्षकाने सहभाग घेणेबाबत प्रोत्साहित करण्यात यावे. ही निवडप्रक्रिया केंद्र स्तरावर राबविण्याची जबाबदारी केंद्रप्रमुखांची राहील. स्पर्धानिहाय सहभाग घेणाऱ्या कर्मचाऱ्याची लेखी संमतीही घ्यावी.
६. तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन व संनियंत्रण स्थानिक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने करावे. यासाठी आवश्यकतेप्रमाणे विभागातील सर्व स्थानिक अधिकारी / कर्मचारी यांची मदत घ्यावी. तसेच आयोजक जिल्ह्याचेही वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे. प्रत्येक URC क्षेत्र हे एक स्वतंत्र तालुका समजण्यात यावे.
७. विभागस्तरीय स्पर्धांचे आयोजन विभागातील सर्व जिल्ह्यांच्या सहभागाने विभाग मुख्यालयाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने करावे. यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक यांचीही मदत घ्यावी.
८. राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजक जिल्ह्यात करावयाच्या आयोजनाची जबाबदारी ही आयोजक जिल्ह्याची राहील. प्रत्येक स्पर्धेसाठी सर्व स्तरावरील पर्यवेक्षणाची जबाबदारी त्या स्पर्धेच्या आयोजक जिल्ह्याची राहील.
९. सर्व स्पर्धासाठी तालुका स्तरावर सहभाग घेणाऱ्या शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांचे नामनिर्देशन google form द्वारे संकलित करावे, हा google form आयोजक जिल्ह्याने दि. १६- १०-२०२५ पर्यंत तयार करावा. SCERT मार्फत सदर सर्व links सर्व DIET यांना पाठविण्यात येतील. सर्व DIET यांनी या links केवळ केंद्रप्रमुख यांना पाठवाव्यात आणि पाठपुरावा करून केंद्रप्रमुख यांचेमार्फत सर्व सहभागी शिक्षकांची माहिती त्यात भरून घ्यावी. सदरील प्रक्रिया दि. २८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण करावी. Google form मध्ये स्पर्धेची संपूर्ण नियमावली document स्वरुपात सुरुवातीलाच दिलेली असावी. जर स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये काही बदल हवा असेल तर आयोजक जिल्ह्याने CPD विभागाशी त्वरित संपर्क करावा व इतर जिल्ह्यांनी आयोजक जिल्ह्याशी संपर्क करावा.
१०. तालुका स्तरावर प्रत्येक स्पर्धेचा विजेता विभाग स्तरावर स्पर्धेसाठी पात्र राहील.
११. विभाग स्तरावर प्रथम ५ क्रमांकाचे विजेते राज्य स्तरावर सहभागासाठी पात्र राहतील.
१२. दिव्यांग स्पर्धकांना गरजेनुसार आवश्यक साहित्य / सुविधा स्पर्धेच्या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात.
१३. आयोजक जिल्ह्याने उद्भवणाऱ्या सर्व सूचना व तक्रारी हाताळाव्यात. सर्व स्तरावरील स्पर्धा निकोप व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतील याबाबत दक्षता घ्यावी. आवश्यकतेप्रमाणे परिषदेस संपर्क करण्यास हरकत नाही.
१४. एखादा शिक्षक एकापेक्षा जास्त स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छित असेल तर त्याच्या केंद्रातील सर्व शिक्षक एखाद्या तरी स्पर्धेत सहभागी झाले असतील तरच त्याला परवानगी देता येईल. त्यानंतर मात्र स्थानिक जिल्ह्याने अशा शिक्षकास वेळापत्रकाप्रमाणे स्पर्धांमध्ये सहभागासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न करावा,
१५. या स्पर्धांची तयारी करण्यासाठी सुट्टी घेता येणार नाही. तसेच सहभागामुळे अध्ययन-अध्यापनाचे नुकसान भरून काढण्याची जबाबदारी ही संबंधित शिक्षकाची असेल.
१६. सर्व DIET यांनी सर्वच स्पर्धांसाठी सक्षम परीक्षकांची व स्थळांची निवड सुद्धा दि. २८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण करावी आणि आयोजक जिल्ह्यास त्यांच्या BIODATA सह यादी पाठवावी. आयोजक जिल्ह्याने सर्व BIODATA तपासून परीक्षक सक्षम आहेत याची खात्री दि. ३०-१०-२०२५ पर्यंत करावी व सर्व स्तरावरील परीक्षकांची यादी अंतिम करावी.
१७. सर्व स्पर्धाच्या ठिकाणी आवश्यक खबरदारी जसे पिण्याचे पाणी, प्रथमोपचार पेटी, स्वच्छतागृह, वैद्यकीय पथक, सावलीची जागा इ. आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करावेत. याची जबाबदारी स्थानिक DIET ची राहील.
क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत सूचना
वैयक्तिक क्रीडा स्पर्धाः
तालुका/विभाग/राज्य स्तरावर उपरोक्त स्पर्धाप्रमाणेच आयोजनाची कार्यपद्धती राहील.
सांघिक क्रीडास्पर्धाः
१. प्रत्येक संघ हा जिल्हा स्तरावर तयार करावा, सांघिक स्पर्धेसाठी स्थानिक जिल्हा अंतर्गत तालुका स्तरावर सुद्धा संघ तयार होत असल्यास तालुका अंतर्गत स्पर्धा घेऊन आवश्यकतेप्रमाणे सर्व तालुक्यांच्या संघातील उत्कृष्ट खेळाडूंना घेऊन स्पर्धा निहाय स्थानिक जिल्ह्याचा एक संघ निश्चित करावा.
२. विभाग स्तरावर समाविष्ट जिल्ह्यांकडून प्राप्त नामनिर्देशन / विजयी प्रथम क्रमांकाचा संघ सहभाग घेईल. विभाग स्तरावर विजयी प्रथम क्रमांकाचा संघ राज्य स्तरावर नामनिर्देशित होईल. राज्य स्तरावर ८ विभागांकडून आलेल्या ८ विजयी संघातून अंतिम तीन विजेते निश्चित होतील.
३. वेगवेगळ्या सांधिक क्रीडा स्पर्धांचे राज्यातील स्पर्धेचे वेळापत्रक शक्यतोवर वेगवेगळ्या दिवशी ठेवण्याचा प्रयत्न करावा.
४. सर्व वैयक्तिक क्रीडा स्पर्धा या पुरुष व महिला अशा दोन्ही गटांसाठी स्वतंत्रपणे आयोजित होतील. परंतु सांधिक क्रीडा स्पर्धांमध्ये प्रत्येक चमूत किमान ५०% महिला असणे आवश्यक राहील. यासाठी निवडलेले सांघिक खेळ बदलण्यासही हरकत नाही. उदा. मार्गदर्शन पुस्तिकेत दिलेला कबड्डी हा खेळ वगळावा.
Digitally signed by
RAHUL ASHOK REKHAWAR Date: 14-10-2025
14:25:02 (राहूल रेखावार भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा
सर्व स्पर्धांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेली संपूर्ण शिक्षक अधिकारी कर्मचारी स्पर्धा मार्गदर्शिका पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments