दिनांक 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून प्रतिवर्षी साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना शासन आदेश दिनांक - ०४/०७/२०२५
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दि.०३.१०.२०२४ रोजी झालेल्या बैठकीत मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय झाला. त्यानुषंगाने उपरोक्त नमूद दि.१४.१०.२०२४ रोजीच्या शासन निर्णयास अनुसरुन अभिजात मराठी भाषा दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्याच्या अनुषंगाने शासनस्तरावरुन सविस्तर मार्गदर्शक तत्वे, कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा देताना मराठी भाषेची गेल्या सुमारे २५०० वर्षाची परपंरा गृहीत धरण्यात आली आहे. प्राचीन, जुन्या काळातील ग्रंथांची, लिपींची भाषा, व्यवहाराची, विविध कला प्रकारातील भाषेच्या उपयोगाची गौरवशाली परपंरा विविध समाजघटकांसमोर येण्यासाठी मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी, भाषेचे संवर्धन होण्यासाठी, जनमानसामध्ये मराठी भाषेच्या अभिजाततेची ओळख व्हावी, अभिजात मराठी भाषेसंदर्भातील संशोधन, जनजागृती जास्तीत जास्त व्हावी याकरिता प्रतिवर्षी दि.०३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यास व अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१. राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये, मंडळे/महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी उद्योग, आस्थापना व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था/विद्यापीठे/महाविद्यालये इ. सर्व संस्थामधून अभिजात मराठी भाषेसंदर्भातील जास्तीत जास्त संशोधन, संवर्धन व जनजागृती व्हावी या हेतूने प्रतिवर्षी दिनांक ०३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिवस व दिनांक ०३ ऑक्टोबर ते दि. ०९ ऑक्टोबर या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करण्यात यावा.
२. अभिजात मराठी भाषा सप्ताहामध्ये अभिजात मराठी भाषेसंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा, शिबीरे आयोजित करण्यात यावीत.
३. अभिजात मराठी ग्रंथांची प्रदर्शने आयोजित करावीत. तसेच, ताम्रलेख/शिलालेखांच्या प्रर्दशनांचे आयोजन करुन विद्यार्थी, सामान्य जनतेस मराठी भाषेतील अभिजात ग्रंथपरंपरेची ओळख करुन द्यावी.
४. अभिजात मराठी भाषेच्या अनुषंगाने प्राचीन ग्रंथ संपदेचे समकालीन मराठी मध्ये अनुवाद केलेल्या पुस्तकांचे प्रर्दशन व विक्री करणे.
4. शाळा/महाविद्यालयांमध्ये अभिजात मराठी ग्रंथ संपदेचे डिजिटाईझेशन करुन त्याची विद्यार्थ्यांना तोंडओळख करुन देणे. तसेच, सदर ग्रंथांचे जतन व संवर्धन करण्याच्या पध्दतीचा चलचित्र सादरीकरण (स्लाईड शो) करणे.
६. शाळा/महाविद्यालये तसेच, शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेसंदर्भात प्रश्नमंजूषेचे (quiz), निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करणे.
सदर परिपत्रकाद्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना नमूद करण्यात येते की, त्यांनी मराठी भाषा जिल्हा समितीचे प्रमुख या नात्याने प्रत्येक जिल्हयात ०३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिवस व दिनांक ०३ ऑक्टोबर ते दि. ०९ ऑक्टोबर या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्याच्या अनुषंगाने कार्यक्रमाचे नियोजन करावे. तसेच, सर्व सचिव, सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त कार्यालयांना सदर परिपत्रक निर्दशनास आणावे व त्याअनुषंगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हयात संपन्न झालेल्या विविध कार्यक्रमांबाबतचा जिल्हयांचा अहवाल दि.३१ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत श्री.अ.वा. गिते, नोडल अधिकारी तथा भाषा उपसंचालक (विधि), भाषा संचालनालय यांच्या arun.gite@gov.in या ई-मेल वर सादर करावा.
दिनांक ०३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिवस व दिनांक ०३ ऑक्टोबर ते दि. ०९ ऑक्टोबर या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करण्याकरिता येणारा खर्च प्रत्येक वित्तीय वर्षात त्या त्या संबंधित विभागाने / कार्यालयाने त्यांच्या कार्यालयीन खर्चासाठी मंजूर असलेल्या आर्थिक तरतूदीतून भागविण्यात यावा.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संगणक संकेतांक २०२५०७०४१२५२२०७४३३ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
Digitally signed by SHILPA RAJENDRA DESHMUKH Date: 2025.07.04 12:53:39 +05'30'
(शिल्पा देशमुख)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments