शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी सन २०२२ - प्रथम टप्प्यातील १० टक्के राखीव पदांबाबत निर्णय बाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 26 मे 2019 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
क्रमांक : संकीर्ण २०२६/प्र.क्र. २१४/टीएनटी-१
दिनांक : २६ मे, २०२६.
प्रति,
आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
विषय : शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी सन २०२२ - प्रथम टप्प्यातील १० टक्के राखीव पदांबाबत निर्णय.
संदर्भ : १. रिट याचिका क्र. ३२०३/२०२५ (मधुबाला भरतनाथ यादव विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर) या प्रकरणात मा. उच्च न्यायालयाने पारीत केलेला दि. ०४.०२.२०२६ रोजीचा न्यायनिर्णय,
२. शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र. ६६१/टीएनटी-१, दि. १०.०९.२०२४.
महोदय,
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी सन २०२२ च्या आधारे करण्यात आलेल्या शिक्षक पदभरतीच्या पहिल्या टप्यात जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील सर्व प्रवर्गाची १० टक्के पदे राखीव ठेवण्यात आली होती. प्रथम सर्वसाधारण यादी प्रसिध्द केल्यानंतर समांतर आरक्षणाची पदे संबंधित प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्याने त्या त्या प्रवर्गाच्या सर्वसाधारण वर्गवारीत रुपांतरीत करण्यात आली. तथापि, माजी सैनिक या समांतर आरक्षणातील १० टक्के पदे सामान्य प्रशासन विभागाच्या अधिनस्थ माजी सैनिक कल्याण विभागाच्या सूचनेनुसार राखीव ठेवण्यात आली.
२. उपरोक्तप्रमाणे राखून ठेवण्यात आलेली पदे प्रतिक्षा यादीतील पात्र उमेदवारांमधून भरण्याबाबत शासनास निवेदने प्राप्त झाली आहेत. प्रतिक्षा यादीतील एका उमेदवाराने दाखल केलेल्या न्यायालयीन प्रकरणात मा. उच्च न्यायालयाने संदर्भ क्र. १ येथील न्यायनिर्णयान्वये खालीलप्रमाणे निर्देश दिले आहेत :-
अ) सदर न्यायनिर्णयातील परि. क्र. १८ मध्ये मा.उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला असे निर्देश दिले आहेत की, अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी सन २०२२ परीक्षेच्यावेळी रिक्त असलेल्या जागांवर नियुक्तीसाठी याचिकाकर्त्यासारख्या उमेदवारांचा विचार करण्यात यावा.
ब) मा. उच्च न्यायालयाने परि. क्र. २० अन्वये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त व भुकंपग्रस्तांसाठी राखीव असलेल्या पदांच्या रुपांतरणाची कार्यवाही जर त्यात काही अन्य कायदेशीर अडचणी नसतील तर शासन करेल.
३. संदर्भ क. २ येथील शासन पत्रान्वये विषयांकित प्रकरणी कार्यवाही करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या होत्या :-
१) बिदुनामावलीतील त्रुटीबाबत सर्वच जिल्हापरिषदांकडून शहानिशा करुन १० टक्के रिक्त पदभरतीबाबत प्रमाणपत्र घेऊन दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीमध्ये रिक्त १० टक्के पदभरतीचा समावेश करण्यात यावा.
२) भरती प्रक्रियेमधील अपात्र, गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरणे.
३) महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाकरीता अधिनियम, २०२४ राज्यात दि. २६.०२.२०२४ पासून लागू झाल्यामुळे नव्याने येणाऱ्या जाहिरातींमध्ये एसईबीसी या प्रवर्गाकरीता विहित आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिराती देणेबाबत सूचना देण्यात आल्या.
४) आरक्षणातील बदल झाल्यामुळे एसईबीसी, इमाव या प्रवर्गासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या स्व प्रमाणपत्रात योग्य तो बदल करुन कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
४. वरीलप्रमाणे वस्तुस्थिती असली तरी प्रस्तावांतर्गत १० टक्के राखीव जागा प्रतिक्षा यादीतील पात्र उमेदवारांमधून भरण्यास खालीलप्रमाणे अडचणी निदर्शनास आल्या आहेत :-
१) शिक्षक पदभरतीचा पहिला टप्पा सन २०२२-२३ च्या संचमान्यतेनुसार राबविण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्याच्यावेळी सन २०२४-२५ च्या संचमान्यता निर्गमित झाल्या असल्याने त्या विचारात घेणे भाग होते. यामुळे उपलब्ध पदसंख्येत घट झाली ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
२) शिक्षक पदभरतीच्या पहिल्या टप्प्याच्यावेळी एसईबीसी आरक्षण अस्तित्वात नव्हते. तथापि, दुसन्या टप्याच्यावेळी हे आरक्षण लागू झाल्याने त्यानुसार बिंदुनामावली प्रमाणित करुन घेणे क्रमप्राप्त होते. १० टक्के राखीव जागांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात करण्यात आला असला तरी बदललेल्या धोरणामुळे आरक्षणात बदल झाला आहे.
३) माजी सैनिक प्रवर्गातील १०० टक्के जागा रुपांतरीत करण्याबाबत प्रस्तावित करण्यात आले होते. तथापि, सामान्य प्रशासन विभागाच्या अधिनस्थ माजी सैनिक कल्याण विभागाने १० टक्के पदे राखीव ठेवण्याचे सूचित केल्याने ती पदे रुपांतरीत करता आली नाहीत. सन २०२५ च्या परीक्षेच्या आधारे केल्या जाणाऱ्या पदभरतीत ही पदे उपलब्ध होणार आहेत.
४) या विभागाच्या दि. १०.११.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये अशी तरतूद करण्यात आली आहे की, उमेदवारास प्रत्येकवेळी नव्याने होणान्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील. उमेदवाराचे त्या पूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिध्द झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी-२०२५ संपन्न झाली असून याचा निकाल दि. १८.०८.२०२५ रोजी प्रसिध्द होऊन जवळपास ८ महिने इतका कालावधी लोटला आहे. त्यामुळे सन २०२२ मधील परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणाच्या आधारे सन २०२६ मध्ये भरती करणे संयुक्तीक होणार नाही. तसेच प्रत्यक्षात ते शक्य देखील होणार नाही.
५) सन २०२२ मधील गुणवत्तेनुसार पदभरती झालेली आहे. आता सन २०२५ नुसार दि. ०१.०५.२०२६ पासून पवित्र पोर्टलवर नव्याने जाहिराती येत आहेत. सदर जाहिरातीसाठी टेट २०२५ परीक्षा दिलेले उमेदवार पात्र आहेत.
५. उपरोक्त अडचणी विचारात घेऊन विषयांकित १० टक्के पदे प्रतिक्षा यादीतील उमेदवारांमधून भरता येणे शक्य नसल्याने ती न भरण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे. सदर निर्णय सर्व संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात यावा.
आपला
(शरद माकणे)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
प्रत,
१) शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
२) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
४) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक), (सर्व)
५) निवड नस्ती, टीएनटी-१
संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
दिनांक २७/०२/२०२४
शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक
• शिक्षक पदभरतीच्या पहिल्या टप्यातील मुलाखतीशिवाय पदभरती याप्रकारातील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे व अभियोग्यताधारकांना त्यांच्या अनुज्ञतेनुसार योग्य त्या निवड यादीत समाविष्ट केले गेले आहे. तरी देखील यासंदर्भात अभियोग्यताधारकांची काही वेगळी धारणा असल्यास त्याबाबत तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे edupavitra2022@gmail.com या ई-मेलवर तक्रार अर्ज सादर करता येईल. त्याचा नमुना विहित करण्यात आला असून News Bulletin मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या नमुन्यात आपला अर्ज त्यास याबाबत अधिकृत माहिती जाणून घेता येईल. केवळ या ईमेल ऍड्रेस चाच वापर करावा. त्या ईमेल ऍड्रेसवर कोणीही ग्रुप मेल अथवा अन्य ईमेल पाठवू नयेत. तसेच कोणत्याही अधिकाऱ्यांच्या व्यक्तिगत व्हॉटसअप अथवा मोबाईलवर या संदर्भात संपर्क करू नये.
• जिल्हा परिषदेकडील बिंदुनामावली तपासल्यानंतर प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करुन भरण्यासाठी शिल्लक ठेवलेल्या १० टक्के जागांबाबत संबंधित जिल्हयांकडून अहवाल घेण्यात येत आहेत, काही जिल्हयाचा अहवाल अप्राप्त आहे त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उर्वरित रिक्त १० टक्के जागांबाबत यथोचित निर्णय घेण्यात येईल.
• अनुसूचित जमातीच्या पेसा क्षेत्रातील १३ जिल्हयातील रिक्त जागांबाबत उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी यापुर्वीच पूर्ण झाली आहे. परंतु मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे विशेष अनुज्ञा याचिका दाखल असल्याने पेसा क्षेत्रातील रिक्त पदांची पदभरती पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना निवड झाल्यानंतर नवीन पदांवर रूजू होता येईल तसेच पेसा क्षेत्राबाबत मा. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्या जागाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. यास्तव अनुसूचित जमाती प्रवर्गात नव्याने निवड झालेल्या उमेदवारांनी आपल्या कागदपत्राची पडताळणी संबंधित जिल्हयाकडे उपस्थित राहून करून घ्यावी.
• भाषा विषय-इंग्रजी साठी निवडलेल्या या शिक्षकांना त्यांचे विषय शिकवावयाचे आहेत. उर्दू माध्यमाची गरज असेल तेव्हा शाळेत उर्दू शिक्षक उपलब्ध आहेतच. केवळ एक शिक्षक अन्य माध्यमातील असणार आहे यामुळे विद्यार्थ्यांना अन्य भाषिक शिक्षक देखील उपलब्ध होतोय, त्यामुळे भाषा विषय अथवा सेमी इंग्रजी यासाठी वेगळा विचार करण्याची गरज नाही.
• साधन व्यक्ती या पदासाठी शासन पत्र दिनांक २५/०१/२०२४ नुसार संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचेस्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील यथोचित निर्णय घेण्यात येईल.
• याभरतीमध्ये रिक्त राहिलेली पदे (माजी सैनिक, अंशकालीन इ.) याबाबत पडताळणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. तसेच नव्याने जेव्हा जाहिराती येतील तेथून पुढे टप्पा-२ मधील जाहिराती असतील.
• शासन निर्णय दिनांक १०/११/२०२२ मधील तरतुदीनुसार नव्याने जाहिरात घेण्याबाबत योग्य वेळी पोर्टलवर सूचना देण्यात येतील. पुढील नव्याने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होईपर्यंत येणाऱ्या जाहिरातीसाठी चालू चाचणीतील उमेदवार पात्र असतील.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.




0 Comments