बदली अपडेट - जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित नवीन धोरण दिनांक 18 जून 2024 ग्रामविकास विभाग

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 18 जून 2024 रोजी दिनांक सात एप्रिल 2021 रोजी चा  शासन निर्णय अधिक्रमित करून जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण निर्गमित केले आहे ते पुढील प्रमाणे.


प्रस्तावना :-

जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाचे नव्याने बदली धोरण निश्चित करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, जिल्हा परिषद शाळांमधील घटणारी पटसंख्या, अध्यापनातील स्थैर्य, शिक्षकांना काम करताना उद्भवणाऱ्या अडी-अडचणी विचारात घेऊन वाचा क्र.१ येथील दि.०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांबाबतचे सुधारित बदली धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सन २०२२ ची ऑनलाईन बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर काही शिक्षक संघटनांकडून सूचना/निवदने शासनास प्राप्त झाली आहेत. तसेच शासन निर्णय दि.०७.०४.२०२१ मधील काही तरतूदी आव्हानित करणाऱ्या रिट याचिका मा. उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांमध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत. यासंदर्भातील गांभीर्य विचारात घेवून रिट याचिका क्र. ६७७/२०२३ मध्ये संदर्भ क्र. २ येथील दि.१३.०१.२०२३ रोजीच्या पत्रान्वये मा. उच्च न्यायालयासमोर शासनाने मांडलेल्या भूमिकेस अनुसरुन, जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पध्दतीने होणाऱ्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांबाबत शासन निर्णय दि.०७.०४.२०२१ मधील तरतूदी व त्याअनुषंगाने प्राप्त सूचना/निवेदने याबाबत शिफारशी करण्यासाठी वाचा क्र. ३ येथील दि. १४ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये अभ्यासगट नेमण्यात आला. सदर अभ्यासगटाने केलेल्या शिफारशींना अनुसरून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्हांतर्गत बदलीबाबतच्या धोरणामध्ये अधिक सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-

उपरोक्त बाबींचा विचार करून शासनाने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने वरील संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णय अधिक्रमित करुन आता जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी या शासन निर्णयान्वये खालीलप्रमाणे सुधारीत धोरण निश्चित करण्यात येत आहे.


व्याख्या :-

१.१ अवघड क्षेत्र :- परिशिष्ट १ मध्ये नमूद असणाऱ्या ७ बाबींपैकी किमान ३ बाबींची / निकषांची पूर्तता होईल असे गाव/शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल.

१.२ सर्वसाधारण क्षेत्र: वरील अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे ही सर्वसाधारण क्षेत्रात मोडतील.

१.३ बदली वर्षः- ज्या कॅलेंडर वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत बदल्या करावयाच्या आहेत ते वर्ष.

१.४ बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा अवघड क्षेत्र निहाय व सर्वसाधारण क्षेत्र निहाय बदली वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा.

१.५ शिक्षक :- या शासन निर्णयाचे प्रयोजनार्थ शिक्षक म्हणजे जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक / पदवीधर शिक्षक / मुख्याध्यापक.

१.६ सक्षम प्राधिकारी : शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील.


१.७ बदली अधिकार प्राप्त शिक्षक :-

१.७.१ बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा ३ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक.

१.७.२ अवघड क्षेत्रातील शाळांची सुधारित यादी प्रसिध्द केल्यानंतर सर्वसाधारण क्षेत्र म्हणुन घोषित झालेल्या मात्र पूर्वी अवघड क्षेत्रामध्ये मोडणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची सलग सेवा ३ वर्ष झालेली असेल तर, त्यांना पुढील बदली वर्षामध्ये बदली अधिकार प्राप्त करण्यासाठी ग्राहय धरण्यात येईल.


१.७.३. बदली प्रक्रीयेमधून वगळण्यात येणारे शिक्षकः-

१) पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत असे शिक्षक.

२) बदली प्रक्रीया सुरु असताना निलंबित / सेवेतून कार्यमुक्त केलेले शिक्षक.

१.८ विशेष संवर्ग शिक्षक भाग-१: खाली नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ म्हणून गणले जातील.

१.८.१ पक्षाघाताने आजारी शिक्षक (Paralysis)

१.८.२ दिव्यांग शिक्षक (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक

१४.१.२०११ मधील नमूद प्रारुपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक), मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक (पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ), तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक १.८.३ हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक.

१.८.४ एकच मुत्रपिंड (किडनी) असलेले / मुत्रपिंड रोपण केलेले शिक्षक / डायलीसीस शिक्षक

१.८.५ यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक

१.८.६ कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक

१.८.७ मेंदुचा आजार झालेले शिक्षक

१.८.८ यॅलेसेमिया / कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालक/जन्मजात गुणसुत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार (उदा. Methyl Malonic Acidemia (MMA) Classical type (Mutase deficiency व इतर आजार) (पालक म्हणजे आई-वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ), तसेच ज्या शिक्षकांचे आई किंवा वडील कॅन्सरग्रस्त आहेत व त्यांचेवर उपचार सुरू आहेत असे शिक्षक

१.८.९ माजी सैनिक तसेच आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा

१.८.१० विधवा शिक्षक

१.८.११ कुमारिका शिक्षक

१.८.१२ परित्यक्ता / घटस्फोटीत महिला शिक्षक

१.८.१३ वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक

१.८.१४ स्वातंत्र्य सैनिकांचा मुलगा / मुलगी / नातू / नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत)

खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधिग्रस्त आहेत असे शिक्षक :

१.८.१५ हृदय शस्रक्रिया झालेले

१.८.१६ एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी / डायलिसीस सुरु असलेले

१.८.१७ यकृत प्रत्यारोपण झालेले

१.८.१८ कॅन्सरने (कर्करोग) आजारी असलेले

१.८.१९ मेंदूचा आजार झालेले.

१.८.२० यॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले

१.९ विशेष संवर्ग शिक्षक भाग २: पती-पत्नी एकत्रीकरण (जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकांपासून ३० कि.मी. पेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल.)

१.९.१ पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर,

१.९.२ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर,

१.९.३ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर,

१.९.४ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर, उदा. महानगरपालिका/नगरपालिका

१.९.५ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी

१.९.६ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक / कर्मचारी असेल तर,

१.९.७ पती-पत्नी दोघांपैकी एक / दोघेही शिक्षणसेवक / तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक म्हणून कार्यरत असेल तर,


१.१० बदलीस पात्र शिक्षक :-

बदलीस पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात किंवा अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा १० वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा ५ वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक. तथापि, अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील ५ वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राथम्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाजेष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करुन पदस्थापित करण्यात येईल (टप्पा क्र. ७ नुसार).नाही


 २. शिक्षकांची जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आवश्यक माहिती प्रसिध्द करणे:-

२.१ जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे परिशिष्ट-१ मध्ये नमूद केलेल्या समितीच्या अहवालानुसार अवघड क्षेत्रात येणाऱ्या शाळांची व सर्वसाधारण क्षेत्रातील शाळांची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसिध्द करतील.

२.२ प्रशिक्षण :- जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील बदली प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व शिक्षक यांची एक दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे आयोजित करतील.


२.३ शाळानिहाय रिक्त जागा घोषित करणे :-

२.३.१ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागांची स्थिती निश्चित करतील. सदर कार्यवाही करीत असताना प्रथमतः मा. उच्च न्यायालयाच्या रिट याचिका क्र.३२७८/२०१० बाबत दिनांक १३.९.२०१२ व दिनांक २१.११.२०१२ रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने आदिवासी / नक्षलग्रस्त क्षेत्रातील सर्व जागा भरण्याची कार्यवाही करणे अपेक्षित असल्याने या भागातील रिक्त जागा निश्चित करण्यात याव्यात. त्यानंतर जिल्हयातील अपेक्षित रिक्त जागांची स्थिती तालुकानिहाय व शाळानिहाय शक्यतो सम प्रमाणात निश्चित करण्यात येईल. यामध्ये निव्वळ रिक्त असलेल्या जागा तसेच सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीस पात्र शिक्षकांच्या रिक्त जागा दाखविण्यात येतील. त्याचप्रमाणे अवघड क्षेत्रातील ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली हवी आहे, त्या जागा दाखविण्यात येतील.

२.३.२ समानीकरणासाठी रिक्त ठेवावयाची पदे भरती किंवा अतिरिक्त खाजगी शिक्षकांच्या समायोजनाद्वारे उपलब्ध झाल्याशिवाय समुपदेशनासाठी खुली करता येणार नाहीत. २.३.३ अशाप्रकारे शाळानिहाय ठेवावयाच्या रिक्त पदांची यादी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात येईल.

२.३.४ शिक्षकांच्या बदल्या करीत असताना समानीकरणांतर्गत रिक्त ठेवाव्या लागणाऱ्या जागांवर बदलीने नियुक्ती दिली जाणार नाही.


२.४ शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करणे :-

२.४.१ शिक्षणाधिकारी प्रथमतः प्रतिवर्षी बदलीस पात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याया प्रसिध्द करतील. तसेच टप्पा क्र.७ साठी पात्र असणाऱ्यांची यादी प्रसिध्द करतील (अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याकरीता राबविण्यात येणाऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या शिक्षकांची यादी प्रसिध्द करतील).

२.४.२ तसेच विशेष संवर्ग भाग १ व भाग २ मध्ये अर्ज केलेल्या शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करतील.

२.४.३ उपरोक्त नमूद याद्यांबाबत आक्षेप असल्यास याद्या प्रसिध्द झाल्यापासून तीन दिवसात शिक्षणाधिकाऱ्यांकडे याद्यांमधील दुरुस्तीसाठी संबंधित शिक्षकास अर्ज करता येईल. या अर्जावर शिक्षणाधिकारी हे पुढील सात दिवसात निर्णय घेतील. शिक्षणाधिकाऱ्यांच्या निर्णयाने संबंधित शिक्षकांचे समाधान न झाल्यास त्याबाबतचे अपील सदर निर्णयाच्या दिनांकापासून तीन दिवसात मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे करता येईल. सदर अपिलावर मुख्य कार्यकारी अधिकारी सात दिवसात निर्णय घेतील. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलेला याबाबतचा निर्णय अंतिम असेल.

२.४.४ बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल पडताळणी व दुरुस्ती बदली प्रक्रीया सुरु होण्यापूर्वी अंतिम करण्यात येईल. बदली प्रक्रीया सुरु झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईल मध्ये कोणतीही दुरुस्ती करण्यात येणार नाही.


शिक्षकांकडून बदलीसाठी पसंती क्रम घेणे :

३.१ बदलीस पात्र शिक्षक यांचेकडून जिल्ह्यातील ३० शाळांचा पसंतीक्रम त्यांच्या बदलीने द्यावयाच्या नेमणूकीसाठी मागविण्यात यावा. (सोबतच्या विवरणपत्र १ नुसार).

३.२ बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली हवी असल्यास त्यांनी जिल्ह्यातील ३० शाळांचा पसंतीक्रम त्यांना बदलीने द्यावयाच्या नेमणूकीसाठी देणे आवश्यक राहील. (सोबतच्या विवरणपत्र २ नुसार)

३.२.१ विशेष संवर्ग शिक्षक भाग १ मधील शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा बदलीस पात्र यादीत नाव असताना बदली नको असल्यास किंवा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याच्या टप्प्यासाठीच्या यादीत नाव असताना बदली नको असल्यास त्यांनी सोबतच्या विवरणपत्रात नमूद केलेप्रमाणे अर्ज करावा (विवरणपत्र ३).

३.२.२ विशेष संवर्ग शिक्षक भाग २ मधील शिक्षकांना बदली हवी असल्यास, किंवा बदलीस पात्र यादीत नाव असल्यास, त्यांनी सोबतच्या विवरणपत्र ४ मध्ये नमूद केलेप्रमाणे अर्ज करावा. विशेष संवर्ग शिक्षक भाग २ मधील शिक्षकांनी पसंतीक्रम देताना जोडीदाराच्या शाळेपासूनच्या ३० कि.मी. अंतरातील अथवा त्या तालुक्यात असलेल्या शाळांचा पसंतीक्रम द्यावा.

३.३ बदलीस पात्र शिक्षकांनी उपरोक्त नमूद केलेप्रमाणे पसंतीक्रम न दिल्यास किंवा त्यांना त्यांचे पसंतीप्रमाणे बदली देणे शक्य नसल्यास त्यांची बदली उपलब्ध असणाऱ्या पदावर करण्यात येईल.


४. बदली प्रक्रिया कार्यपध्दती :-

४.१ टप्पा क्र.१ : ज्या शाळांमध्ये ठेवावयाच्या रिक्त पदांपेक्षा कमी पदे रिक्त असल्यास, अशा शाळांमध्ये जर बदलीस पात्र शिक्षक असतील तर अशा शिक्षकांची बदली त्या शाळेतून करण्यात येईल. तथापि, अशा शाळांमध्ये बदलीस पात्र शिक्षक नसतील तर खाली नमूद केलेल्या प्रक्रियेप्रमाणे त्यांचा बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीमध्ये समावेश करण्यात येईल. उदा.:- एखाद्या शाळेत १० शिक्षकांचा मंजूर आकृतीबंध आहे. मुद्दा क्र.२.३ नुसार या शाळांमध्ये शिक्षकांच्या तीन जागा रिक्त ठेवावयाच्या आहेत, सद्य:स्थितीत या शाळेत एकच पद रिक्त आहे त्यामुळे आणखी दोन शिक्षकांची पदे रिक्त ठेवणे आवश्यक आहे.

४.१.१ ज्या शाळेत तीन बदलीस पात्र शिक्षक आहेत, अशा वेळी तेथील दोन बदलीस पात्र शिक्षकांची बदलीसाठी निश्चित धरावयाच्या सेवेच्या सेवाजेष्ठतेनुसार बदली करण्यात येईल व अशा पध्दतीने मुद्दा क्र.२.३ नुसार तीन जागा रिक्त ठेवण्यात येतील.

४.१.२. शाळेत एकच बदलीस पात्र शिक्षक आहे अशावेळी त्या एका शिक्षकाची बदली होईल व एकूण दोन पदे त्या शाळेत रिक्त राहतील.


४.२ टप्पा क्र.२ :- विशेष संवर्ग शिक्षक भाग १ यांच्या बदल्या :-

४.२.१. टप्पा क्र. १ प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर बदलीस पात्र शिक्षकांच्या जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग भाग-१ शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. तद्नंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ यांच्या बदल्या करण्यात याव्यात.

४.२.२. विशेष संवर्ग भाग-१ शिक्षकांना केवळ त्यांच्या विनंतीवरुनच बदली देण्यात येईल. ज्या विशेष संवर्गातील शिक्षकांना बदली नको असेल, मात्र त्यांचे नाव बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीत असल्यास त्यांनी सोबत जोडलेल्या विवरणपत्र क्र.३ मध्ये स्वयंघोषित प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील.

४.२.३. विशेष संवर्गांतर्गत विनंती बदलीसाठीचा प्राधान्यक्रम हा विशेष संवर्ग शिक्षकांच्या वरील व्याख्येमध्ये नमूद केलेल्या क्रमवारीनुसार राहील.

४.२.४. एखाद्या विशिष्ट संवर्गामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी विनंती बदली मागितली असल्यास त्यांच्या सेवाज्येष्ठता विचारात घेऊन जेष्ठ कर्मचाऱ्यास प्रथमतः बदली अनुज्ञेय राहील.

४.२.५. सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास प्राधान्याने बदली अनुज्ञेय राहील.

४.२.६. या संवर्गातील शिक्षकांचे बदल्यांसाठी प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्यात येईल. या यादीच्या आधारे बदली करताना, शिक्षकांचा पसंतीक्रम विचारात घेऊन ज्या शाळांमध्ये बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध असतील त्या शाळेत प्राधान्यानुसार शिक्षकांची बदली करण्यात येईल. जर एखाद्या विशेष संवर्ग शिक्षकाला त्यांच्या पसंतीक्रमाप्रमाणे एकाही शाळेमध्ये (तेथे बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध नसल्याने) बदली देता आली नाही तर त्याची बदली विशेष संवर्ग भाग १ मधुन होणार नाही. तथापि, त्यांने विशेष संवर्ग भाग-१ अंतर्गत विनंती बदलीसाठी होकार दर्शविला असल्यास व दिलेले पर्याय उपलब्ध न झाल्यास तसेच असा शिक्षक पुढील बदली संवर्गामध्ये पात्र होत असल्यास संबंधित टप्प्यावर असा शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये सहभागी राहील.

४.२.७. विशेष संवर्ग भाग १ अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.

४.२.८. विशेष संवर्ग भाग १ मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्र. अप्रवि- २०१८/प्र.क्र.४६/आरोग्य-६, दि.१४.९.२०१८ मधील तरतूदी नुसार दिव्यांगत्वाबाबतचे ऑनलाईन युडी-आयडी प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. सदर अर्ज व दिव्यांग प्रमाणपत्राबाबत संबंधित गटाचे गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची त्रिसदस्यीय समिती निर्णय घेईल.


४.३. टप्पा क्र.३ :- विशेष संवर्ग शिक्षक भाग -२ यांच्या बदल्या

४.३.१. टप्पा क्र.२ प्रमाणे कार्यवाही झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग भाग-२ शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. तद्नंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ यांच्या बदल्या करण्यात याव्यात.

४.३.२. जे शिक्षक विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ मध्ये मोडतात त्यांनी विवरणपत्र क्र.४ मधील नमुन्यात स्वयंघोषीत प्रमाणपत्र दोघांच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक आहे.

४.३.३. जर दोघेही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठी अर्ज करु शकेल. 

४.३.४. उपरोक्त प्रमाणे पती-पत्नी एकत्रीकरण झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी या शासन निर्णयातील नमूद केलेल्या कार्यपध्दती लागू होतील. या तरतुदींप्रमाणे संबंधिताची बदलीस पात्र सेवा झाल्यानंतर त्यांची पुढील बदली करताना उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे त्यांना एक एकक (one unit) मानून बदलीने नियुक्ती देता येईल. पर्यायाने ज्या ठिकाणी दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अन्यथा ३० कि.मी. परिसरात दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अथवा संबधितांनी मागणी केलेल्या सोयीच्या ठिकाणी शक्यतो त्यांची बदली केली जाईल. जर दोघे पती पत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर एकत्रीकरण झाल्यानंतर त्या दोघांना एक एकक म्हणून विचारात घ्यावयाचे आहे. यापैकी एकाची पण बदलीस पात्र सेवा झाली असल्यास त्या दोघांनाही बदलीस पात्र धरण्यात येईल.

४.३.५. विशेष संवर्ग भाग २ अंतर्गत संबंधित शिक्षकांनी जोडीदाराच्या शाळेपासून ३० कि.मी. अंतराबाबत सादर केलेले प्रमाणपत्र / दाखला याची पडताळणी गट शिक्षण अधिकारी यांचेद्वारा तालुकास्तरावर करण्यात यावी. ३० कि. मी. रस्त्यांचे अंतर हे सर्वात नजीकच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात यावे. सदरच्या ३० कि.मी. रस्त्याच्या अंतराचा दाखला देण्यास कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग/कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, बांधकाम हे सक्षम प्राधिकारी राहतील.

४.३.६. विशेष संवर्ग भाग-२ अंतर्गत बदली घेतल्यास पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.

४.३.७. विशेष संवर्ग भाग-२ अंतर्गत लाभ घेणारे दोन्ही कर्मचारी एकाच जिल्ह्यात कार्यरत असणे आवश्यक आहे.


४.४. टप्पा क्र.४ - बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या :-

४.४.१. टप्पा क्र.३ प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागा व बदलीस पात्र शिक्षकांच्या जागांची यादी जाहीर करण्यात यावी व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. तद्नंतर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील.

४.४.२. यासाठी ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची ३ वर्षाची बदली करण्यासाठी निश्चित धरावयाची अवघड क्षेत्रातील सलग सेवा पूर्ण झाली असेल अशा शिक्षकांनी बदलीसाठी विवरणपत्र-२ मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.

४.४.३. अवघड क्षेत्रामध्ये कार्यरत बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली करताना त्यांची एकूण सेवा जेष्ठता विचारात घेण्याऐवजी ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रातील सलग वास्तव सेवा जास्त झालेली आहे, त्यांना प्राधान्य देण्यात यावे.

४.४.४. अवघड क्षेत्रातील वास्तव सेवा ज्येष्ठता समान असल्यास वयाने जेष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली अनुज्ञेय राहील.

४.४.५. बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या ह्या टप्पा क्र. ४ मधील सुधारीत रिक्त जागा व बदलीस पात्र शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या विनंतीतील प्राधान्यक्रमानुसार केल्या जातील.

४.४.६. बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही तर उपलब्ध होणाऱ्या पदांवर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल.

४.४.७ बदली अधिकार प्राप्त संवर्गातील शिक्षकांना पती पत्नी एक युनिट या तरतुदीचा लाभ देण्यात येईल.


४.५ टप्पा क्र. ५:- बदलीस पात्र शिक्षकांची बदली करण्याची कार्यपध्दती :-

४.५.१. टप्पा क्र.१, २, ३ व ४ मध्ये नमुद केलेल्या कार्यपध्दतीमुळे, बदली होत असलेले व बदलीस पात्र शिक्षक यांची एक ज्येष्ठतायादी, जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन करण्यात येईल. सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व शिल्लक शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल.

४.५.२. सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली प्राधान्याने अनुज्ञेय राहील.

४.५.३. या यादीतील शिक्षकांच्या त्यांच्या प्राध्यान्यक्रमाने व त्यांच्या पसंतीनुसार बदल्या करण्यात येतील. परंतु ह्या शिक्षकांची बदली ही ते ज्या शाळेत जाण्यास इच्छुक आहेत त्या शाळेत ठेवावयाच्या रिक्त जागा सोडून अन्य रिक्त जागा असतील, त्याच रिक्त पदांवर बदली होऊ शकते.

वरीलप्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल.


४.७. टप्पा क्र. ७:- अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणेसाठी राबवावयाचा टप्पा:-


टप्पा क्र.६ पूर्ण झाल्यानंतर अवघड क्षेत्रातील भरणे आवश्यक असलेल्या रिक्त जागा शिल्लक राहिल्यास मुद्दा क्र. १.१० मध्ये नमूद केल्यानुसार अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे हा टप्पा क्र. ७ राबविण्यात येईल. या टप्यात समाविष्ट होणाऱ्या शिक्षकांची यादी प्रथम जाहीर करण्यात यावी. (मुद्दा क्र. २.४.१). विशेष संवर्ग भाग-१ मध्ये समाविष्ट असलेले व टप्पा क्र. ७ साठी पात्र शिक्षकांपैकी ज्या शिक्षकांनी बदलीस नकार दर्शविला आहे (मुद्दा क्र.४.२.२ अन्वये) अशा शिक्षकांची बदली या टप्यात होणार नाही.


४.८. कार्यमुक्तीचे आदेश :-

बदलीने पदस्थापनेचे आदेश निर्गमित करताना त्यामध्ये कार्यमुक्तीचा दिनांक नमूद करण्यात यावा. कार्यमुक्तीच्या दिनांकानंतर ते बदली होण्यापूर्वी ज्या ठिकाणी कार्यरत होते त्या ठिकाणावरुन त्यांचे वेतन अथवा कोणतीही देयके अदा करु नयेत. बदलीनंतर संबंधित शिक्षक बदलीच्या ठिकाणी रुजू होत नसेल तर अशा शिक्षकाविरुध्द मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करावी,


इतर धोरणात्मक बाबी :-

५.१ शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या ह्या ऑनलाईन पध्दतीनेच करण्याचा निर्णय शासन घेत आहे.

यासाठी खालील प्रमाणे कार्यपध्दती अवलंबविण्यात यावी.

५.१.१. राज्य स्तरावर शिक्षकांच्या ऑनलाईन पध्दतीने बदल्यांसाठी एक नोडल ऑफीसरची नेमणूक करण्यात येईल.

५.१.२. तांत्रिक बार्बीसाठी एक कार्यक्रम अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी. जिल्हा स्तरावरील सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्याची त्यांची जबाबदारी राहील.

५.२ मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्येक शिक्षकाचा पसंतीक्रम दिसेल. शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर संबंधित संगणक यंत्रणेने बदलीच्या पूर्ण प्रकियेची सविस्तर माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उपलब्ध करुन द्यावी.

४.५.४, बदली प्रक्रीयेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास सेवा ज्येष्ठता विचारात न घेता प्राधान्याने अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल.

४.५.५. सर्व शिक्षकांना किमान ३० अथवा टप्पा क्र.४ ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्तअसलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील.

४.५.६ विशेष संवर्ग भाग १ अंतर्गत पात्र शिक्षकांनी बदलीतून सूट घेतल्यास व संबंधित शिक्षकाचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास, जोडीदाराची बदली पात्र संवर्गातून बदली केली जाईल.


४.६ टप्पा क्र.६ :- विस्थापित शिक्षकांसाठी टप्पा :-

टप्पा क्र.५ पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व टप्पा क्र.५ मधून उरलेल्या शिक्षकांना पसंतीक्रमामध्ये बदल करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी देण्यात येईल. टप्पा क्र. ५ नुसार सर्वांची सेवाज्येष्ठता व पसंतीक्रमानुसार बदली करण्यात यावी. सर्व शिक्षकांना किमान ३० अथवा टप्पा क्र. ५ ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील, या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसल्यास व ५.३ बदली ही संपूर्णपणे प्रशासकीय स्वरुपाची बाब असल्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्याने राजकीय दबाव वापरल्यास महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम, १९६७ मधील नियम ६(५) चा भंग केला म्हणून ती कृती शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र राहील.

५.४ विनंती बदल्यांसाठी कोणतेही भत्ते व पदग्रहण अवधी अनुज्ञेय राहणार नाही.

५.५ प्रशासकीय अथवा विनंती बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्पुरती प्रतिनियुक्ती अशा मार्गाने त्यांच्या पूर्वीच्या नियुक्तीच्या ठिकाणी किंवा कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक सोयीसाठी इतरत्र पदस्थापना देऊ नये, या प्रकारचा प्रयत्न बदलीतील अवैधता/अनियमितता समजून संबंधित अधिकारी शिस्तभंग कारवाईस पात्र होतील.

५.६ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या सामान्यपणे वर्षातून एकदाच दिनांक १ मे ते ३१ मे पर्यंत करण्यात याव्यात.

५.७ काही शिक्षकांनी त्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यासंदर्भात मा. उच्च वा सक्षम न्यायालयात दावा दाखल केला असल्यास अशा प्रकरणात मा. उच्च न्यायालय वा सक्षम न्यायालयाने दिलेल्या आदेशाची सर्वप्रथम अंमलबजावणी करावी व तद्नंतर या शासन निर्णयानुसार जिल्हांतर्गत बदल्याबाबत पुढील कार्यवाही सुरु करावी.

५.८ आरटीई अॅक्टनुसार जिल्हा परिषद शाळांमध्ये कोणत्याही परिस्थितीत १० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त ठेवणे शक्य नाही. त्यामुळे समानीकरणाचे धोरण सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी नियमानुसार राबविण्यात येईल, याची दक्षता घ्यावी, समानीकरणाच्या जागा निश्चित करण्यासाठी संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित जिल्हा परिषदांचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची समिती गठीत करण्यात यावी. समानीकरणासाठी कोणत्या जागा निश्चित कराव्यात, याबाबतचा निर्णय सदर समितीने घ्यावा.

५.९ जिल्हा परिषद शिक्षकांच्या होणाऱ्या जिल्हांतर्गत बदलीच्या प्रचलित संगणकीय प्रक्रियेच्या प्रस्तावित शासन निर्णयामध्ये दिनांक १ मे ते ३१ मे पर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत सूचित केले आहे. परंतु त्या व्यतिरिक्त काही अपरिहार्य व योग्य कारणास्तव (प्रसुती रजेवर, बाल संगोपन रजेवर, गंभीर अपघातामुळे किंवा इतर बाबी) बदली करावयाची झाल्यास ती बदली न करता प्रतिनियुक्ती करण्यात यावी. सदर प्रतिनियुक्ती ही विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लेखी मान्यतेने करण्यात यावी. प्रतिनियुक्ती करताना खालील बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. :

१) बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यावर होणाऱ्या रिक्त पदावर प्रतिनियुक्ती करण्यात यावी. २) त्याठिकाणी शैक्षणिक अडचण होणार नाही, याची खात्री शिक्षणाधिकारी यांनी करावी. ३) एक महिन्यात प्रतिनियुक्ती मागणी करणाऱ्या शिक्षकांचे अर्ज मागवून शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी यादी तयार करावी.

४) कोणकोणते शिक्षक प्रतिनियुक्तीस पात्र आहेत, हे ठरविण्याबाबत जिल्हा स्तरावर खालीलप्रमाणे समिती नियुक्त करण्यात यावी.

(१) उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जिल्हा परिषद अध्यक्ष सदस्य.

(२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद

(३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद,

सदस्य


५) समितीने पात्र ठरविलेल्या शिक्षकांमधून सेवा जेष्ठतेने एका जागेसाठी तीन शिक्षकांचे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत विभागीय आयुक्त यांना सादर करण्यात येतील. विभागीय आयुक्त हे सादर केलेल्या प्रस्तावातील एक जागेसाठी एका शिक्षकाला प्रतिनियुक्ती देण्याबाबत कार्यवाही करतील.

६) सदर प्रतिनियुक्ती ही पाच वर्षातून एकदा देता येईल. ७) प्रतिनियुक्ती दिल्यानंतर संबंधित शिक्षक पुढील वर्षाच्या बदली (१ ते ३१ मे) होणाऱ्या प्रक्रियेमध्ये सेवा जेष्ठतेनुसार बदलीस पात्र होईल.

८) प्रतिनियुक्ती दिल्यानंतर त्यांची नियुक्ती ज्याठिकाणी असेल त्या ठिकाणची मूळ सेवा घरण्यात येईल.

५.१० बदल्यांबाबतच्या अनियमिततेबाबतची तक्रार :

५.१०.१ संगणकीय प्रणालीद्वारे निर्गमित झालेल्या आदेशाच्या विरोधात बदलीच्या अनियमिततेबाबत तक्रार असल्यास त्याचा निपटारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर झाल्यास संबंधित शिक्षकांना जिल्हा परिषद स्तरावरच सत्वर न्याय मिळू शकतो. यासाठी जिल्हांतर्गत बदलीमध्ये शिक्षकांची तक्रार असल्यास सदरच्या तक्रारींची चौकशी करुन निवारण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर एक समिती गठीत करण्यात येत आहे. सदर समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग), शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचा समावेश असेल. बदलीचे आदेश प्राप्त झाल्यापासून संबंधित शिक्षकांनी सात दिवसाच्या आत बदलीबाबत तक्रार असल्यास या समितीकडे तक्रार अर्ज दाखल करावा. तक्रारीच्या संबंधात समितीने चौकशी करुन ३० दिवसाचे आत निर्णय घेण्यात यावा. परंतु बदलीबाबतची तक्रार तपासत असताना गैरसोयीची नियुक्ती म्हणजे बदल्यांमधील अनियमितता नव्हे, असे प्रामुख्याने स्पष्ट करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत घोषित करण्यात आलेल्या अनिवार्य रिक्त जागेवर शिक्षकांची समुपदेशनाने नियुक्ती करता येणार नाही. कारण समानीकरणाचे धोरण हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कासाठी आवश्यक आहे.

५.१०.२ मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समितीने घेतलेल्या निर्णयाने समाधान न झाल्यास संबंधित शिक्षक बदलीच्या अनियमितेबाबत विभागीय आयुक्तांकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश प्राप्त झाल्यापासून ७ दिवसाचे आत दाद मागू शकतात. अशा पध्दतीने विभागीय आयुक्त यांच्याकडे दाखल झालेल्या अपीलवजा तक्रारीवर शक्यतो तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील ३० दिवसांचे आत विभागीय आयुक्तांनी निर्णय घ्यावयाचा आहे. विभागीय आयुक्तांनी घेतलेला निर्णय अंतिम राहील.

५.१०.३ वरीलप्रमाणे बदलीच्या आदेशाच्या विरुध्द अपिलीय प्रक्रिया सुरु असताना जर शैक्षणिक वर्ष आरंभ झाले तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अपिलीय प्रक्रियेला बाधा न येता व शिक्षकांचे अपिलीय अधिकार अबाधीत ठेवून शिक्षकांना त्यांना नेमून दिलेल्या पदस्थापनेवर हजर होऊन शैक्षणिक कर्तव्ये बजावणे बंधनकारक राहील.

५.१०.४ विशेष संवर्ग भाग-१ व विशेष संवर्ग भाग-२ मध्ये ज्या शिक्षकांनी अर्ज भरुन बदली करुन घेतलेली आहे व त्या शिक्षकांबद्दल तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, अशा शिक्षकांची बदलीच्या संबंधित संवर्गाच्या कागदपत्रांची तात्काळ पडताळणी करण्यात यावी. ही पडताळणी करताना नैसर्गिक न्याय म्हणून त्यांना म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांचा अवधी देण्यात यावा.

५.१०.५ अशी पडताळणी करताना एखाद्या शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरुन बदली करुन घेतलेली आहे. अशी बाब आढळल्यास संबंधित शिक्षकाचे निलंबन करुन त्याच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रस्तावित करावी.


सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेताक २०२४०६१८११४२४७०१२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.


(पं. खं. जाधव)

उपसचिव, महाराष्ट्र शासन


परिशिष्टांसह संपूर्ण सुधारित बदली धोरण शासन आदेश डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

2 Comments

  1. सर आता समुपदेशनाने होणाऱ्या बदल्या होणार की नाही?

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.