राज्य शासनाच्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सेवानिवृत्त होताना भरावयाच्या अर्जाचे नमुने एकत्रित करून सुधारित नमुना-५अ तयार करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 15 जून २०१६ रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
महाराष्ट्र शासन वित्त विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२६/प्र.क्र.४६/सेवा-४
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक: १५.०६.२०२६.
वाचा : वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक: सेनिवे-२०१४/प्र.क्र.३६/सेवा-४, दि.०२.०७.२०१५.
प्रस्तावना :-
शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मध्ये विहित केलेली निवृत्तिवेतन विषयक विविध प्रपत्रे कार्यालय प्रमुखांकडे सादर करण्यात येतात. त्या नंतर त्यांचे निवृत्तिवेतन प्रकरण निवृत्तिवेतन प्राधिकृत करण्याकरिता महालेखापाल कार्यालयास पाठविण्यात येते. अशा प्रकारे विविध नमुन्यात आवश्यक माहिती प्राप्त होऊन निवृत्तिवेतन प्रकरण तयार करण्यास व मंजूरी मिळण्यास बराच कालावधी व्यतित होतो आणि पर्यायाने निवृत्तिवेतन प्रदानास त्यामुळे विलंब होतो.
असा विलंब टाळण्यासाठी कार्यपध्दतीत सुधारणा करणे आणि अगदी आवश्यक तेवढी कागदपत्रे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करुन घेणे शक्य व्हावे. याकरीता उपरोक्त संदर्भाकित शासन निर्णय, वित्त विभाग, दि.०२.०७.२०१५ कायम ठेवून महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील नमुना-१, नमुना-३, नमुना-५, नमुना-६, महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ मधील नमुना ४२-अ व महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ मधील नमुना-बी ऐवजी एकाच नमुन्यामध्ये माहिती भरून कार्यालय प्रमुखाकडे सादर करण्यास सर्वसमावेशक नमुना निर्धारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
संदर्भाधीन शासन निर्णयान्वये निवृत्तिवेतनवाहिनी या संगणक प्रणालीवर निवृत्तिवेतन प्रकरण तयार करण्याकरीता सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. दि.०१.०९.२०१५ पासून सदर प्रणालीद्वारे निवृत्तिवेतन प्रकरण तयार करण्यास व सदर ऑनलाईन नगुन्यामध्ये महालेखापाल कार्यालयाकडे सादर करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली असून यापुढे महालेखापाल कार्यालयास निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन प्रकरण विहित वेळेत ऑनलाईन पाठविण्याबाबत कार्यवाही संबंधित कार्यालय प्रमुख यांनी करावी.
२. राज्य शासनातील अधिकारी / कर्मचारी ज्यांचे निवृत्तिवेतन प्रकरण महालेखापाल कार्यालयाकडून मंजूर करण्यात येते व अशा अधिकारी/ कर्मचारी यांची प्रतिनियुक्तीने बदली इतर कार्यालयास झालेली असल्यास अशा प्रकरणी संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचे निवृत्तिवेतन प्रकरण तयार करण्याबाबत कार्यवाही संबंधित प्रशासकीय विभाग अथवा नियुक्ती प्राधिकारी यांनी करावी.
३. निवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी निवृत्तिवेतन विषयक प्रपत्र (Forms) कर्मचारी ज्या कार्यालयाकडून सेवानिवृत्त होत आहे. त्या कार्यालयाकडे सादर करताना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील नमुना-१, नमुना-३, नमुना-५, नमुना-६, महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ मधील नमुना ४२-अ व व महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ मधील नमुना-बी ऐवजी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या नमुना ५-अ या नमुन्यामध्ये कार्यालय प्रमुखाकडे सादर करण्यास दि.०१ जुलै, २०२६ पासून मान्यता देण्यात येत आहे.
४. उपरोक्त नमुना ५-अ मध्ये प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे कार्यालय प्रमुख निवृत्तिवेतन आज्ञावलीमध्ये ऑनलाईन निवृत्तिवेतन प्रकरण तयार करुन संदर्भाधीन शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये भरुन महालेखापाल कार्यालयास प्रकरण पाठवतील.
५. सर्व विभागांची e-HRMS प्रणालीमध्ये ऑनलाईन सेवापुस्तकबाबत कार्यवाही पूर्ण होऊन e-HRMS प्रणाली पुर्णपणे कार्यान्वित होईपर्यंत मूळ सेवापुस्तक (Hard Copy), नमुना ५-अ व निवृत्तिवेतन प्रणालीमध्ये भरण्यात आलेल्या माहितीचा फॉर्म (परिशिष्ट-अ) महालेखापाल कार्यालयाकडे ऑनलाईन व प्रचलित पध्दतीने (Hard Copy) पाठविण्यात यावा.
५. सर्व विभागांची e-HRMS प्रणालीमध्ये ऑनलाईन सेवापुस्तकबाबत कार्यवाही पूर्ण होऊन e-HRMS प्रणाली पुर्णपणे कार्यान्वित होईपर्यंत मूळ सेवापुस्तक (Hard Copy), नमुना ५-अ व निवृत्तिवेतन प्रणालीमध्ये भरण्यात आलेल्या माहितीचा फॉर्म (परिशिष्ट-अ) महालेखापाल कार्यालयाकडे ऑनलाईन व प्रचलित पध्दतीने (Hard Copy) पाठविण्यात यावा.
६. उक्त कार्यपध्दतीस अनुसरुन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग (Shalarth), आदिवासी विकास विभाग (Ashramshalarth), वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग (Ayurvedarth), सामाजिक न्याय विभाग (Samaj Sevaarth), इतर मागास बहुजन कल्याण विभाग (VJNT Sevaarth), पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग (Mafsuarth), कृषी विभाग (Sausevaarth), उच्च व तंत्र शिक्षण विभाग (HTESevaarth), कौशल्य विकास व उद्योजगता विभाग (HTESevaarth) या विभागांनी तसेच भविष्यात अशा प्रकारची "कस्टमाईज्ड सेवार्थ" (Customised Sevaarth) आज्ञावली विकसित करुन अंमलात आणणाऱ्या विभागांनी आपापल्या विभागातील सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांच्या संदर्भात सेवानिवृत्ती प्रकरणे महालेखापाल कार्यालयास पाठविण्यासाठी "कस्टमाईज्ड सेवार्थ" (Customised Sevaarth) आज्ञावलीमध्ये आवश्यक ते विकसन तात्काळ करुन घेणे अनिवार्य राहील. अशा प्रकारच्या विकसनाबाबत आवश्यक असल्यास, संचालनालय, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे सहकार्य घ्यावे.
७. सेवानिवृत्त कर्मचारी यांना निवृत्तिवेतन प्रणालीमध्ये ऑनलाईन नमुना ५-अ फॉर्म भरताना काही अडचणी येत असल्यास कर्मचारी ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त होत आहेत, त्या कार्यालयातील सेवार्थ आज्ञावली हाताळणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांना सहकार्य / मार्गदर्शन करावे,
८. सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी/ कर्मचारी यांना नमुना ५-अ, ऑनलाईन भरण्याबाबत निवृत्तिवेतन वाहिनीमध्ये सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने प्रणालीमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यास संचालनालय, लेखा व कोषागारे, मुंबई यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
९. निवृत्तिवेतन वाहिनीमध्ये नमुना ५-अ ऑनलाईन भरावयाच्या अनुषंगाने अर्जदार किंवा निवृत्तिवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांनी अनुसरावयाची कार्यपध्दती सोबतच्या शासन निर्णयामध्ये परिशिष्ट - १ अन्वये विहित करण्यात येत आहे.
१०. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील या संबंधातील विद्यमान तरतूदी, या शासन निर्णयातील तरतूदींच्या मर्यादेपर्यंत सुधारण्यात आल्या आहेत, असे मानण्यात येईल. या नियमात रितसर सुधारणा यथावकाश करण्यात येईल.
११. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनी.सं.क्र.१९५/२०२६/को.प्र.५, दि.१५.०६.२०२६ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात आले आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक क्रमांक २०२६०६१५१७४५५७४९०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
MANISHA YUVRAJ KAMTE
(मनिषा यु. कामटे)
शासनाचे उप सचिव
प्रति,
१. मा. राज्यपाल यांचे सचिव,
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,
३. मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव,
४. सर्व मा. मंत्री व मा. राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
५. मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा / विधान परिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
६. सर्व सन्माननीय विधानसभा / विधान परिषद व संसद सदस्य. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग
७. मंत्रालयीन सर्व विभागांच्या अधिनस्त असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख
८. प्रबंधक, मूळ न्यायालय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
९. प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा) १, महाराष्ट्र, मुंबई
१०. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई
११. महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
१२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
१३. आयुक्त, आयकर (TDS) चर्नीरोड, मुंबई ४००००२
१४. आयुक्त, आयकर (TDS) सिव्हील लाईन, नागपूर ४४४००१
१५. प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा) मुंबई
१६. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
१७. सचिव, महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालय, मुंबई
परिशिष्ट-१
१. दि. १ जुलै २०२६ पासून सेवानिवृत्त होणाऱ्या व त्यापूर्वी ज्या अधिकारी / कर्मचारी यांनी सेवानिवृत्त होऊनही सेवानिवृत्त वेतन मिळणेबाबतची कागदपत्रे विहित नमुन्यात कार्यालय प्रमुखाकडे सादर केलेली नाहीत, अशा सर्व अधिकारी/ कर्मचारी यांनी दि.१ जुलै २०२६ पासून नमुना ५-अ मध्ये माहिती ऑनलाईन निवृत्तिवेतनवाहिनीमध्ये भरून ते ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत / होत आहेत, त्या कार्यालय प्रमुखाकडे सादर करावी.
२. नमुना ५-अ निवृत्तिवेतनवाहिनीमध्ये ऑनलाईन भरण्याच्या अनुषंगाने https://pension.mahakosh.gov.in या वेब पोर्टलवर Username PENSIONER Password ifms123 लॉगीन करून ही माहिती भरल्यानंतर Worklist या टॅबमध्ये Pensioner Retirement Form यावर क्लिक करावे. तद्नंतर निवृत्तिवेतन प्रकरण भरणेबाबत संबंधित अधिकारी/ कर्मचारी यांची Mobile OTP द्वारे खात्री केल्यानंतर त्यांना फॉर्म भरण्यासाठी उपलब्ध होईल.
३. सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी वैद्यकीय कारणास्तव फॉर्म भरण्यास सक्षम नसल्यास अथवा सेवानिवृत्ती प्रकरण सादर करण्यापूर्वी निवृत्तिवेतनधारक मृत झालेला असल्यास अशा प्रकरणी त्याच्या वतीने त्यांचे कुटुंबातील सदस्यांमार्फत फॉर्म भरुन देण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
४. सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी यांना त्या माहितीमध्ये काही विशिष्ट बदल करावयाचे असल्यास तशी सुविधा निवृत्तिवेतनवाहिनी प्रणालीमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
५. नमुना ५-अ मधील मुद्दा क्र. ६ मध्ये कुटुंबाचा तपशिल भरताना अचूक भरणेबाबत दक्षता संबंधित सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांनी घ्यावी. भविष्यात पती/ पत्नी त्यांच्या पश्चात कुटुंबातील इतर सदस्य यांना कायमचे अपंग असलेले मूल / अविवाहित मुलगी, घटस्फोटित मुलगी / विधवा मुलगी /अज्ञान जुळी अपत्य / दत्तक घेतलेली मुले (शा. नि. दि. ०७.०१.२०२५ अनुसार) आणि शासकीय कर्मचारी हा एकमेव अपत्य असल्यास त्याच्यावर अवलंबन असलेले आई-वडिल (शा. नि. दि. २२.०१.२०१५ अनुसार) याबाबतचा तपशिल होय असल्यास मुद्दा क्र. ६ मधील मध्ये नमूद करावे.
६. कुटुंबातील सदस्य यांना भविष्यात कुटुंब निवृत्तिवेतन देय असल्यास व असे कुटुंबातील सदस्य मानसिक अपंगत्व असल्यास त्यांचे पालक / नामनिर्देशित व्यक्तीची माहिती होय असल्यास (शा. नि. दि. ०८.१०.२०१८ व दि. ११.०६.२०२४ अनुसार) त्याची माहिती मुद्दा क्र. ६ मधील मध्ये नमूद करावी.
७. निवृत्तिवेतन प्रकरण सादर केल्यानंतर निवृत्तिवेतनधारक यांचा मृत्यु झाल्यास अशा प्रकरणी सेवानिवृत्ति उपदान / मृत्यु उपदान नामनिर्देशित मुद्दा क्र. ७ मध्ये भरलेली माहिती अंतिम राहील.
८. निवृत्तिवेतन प्रकरण मंजूर झाल्यानंतर निवृत्तिवेतनधारकाचे निधन झाल्यास निवृत्तिवेतनाची थकबाकी कोषागार कार्यालयाकडून मिळण्याच्या अनुषंगाने नामनिर्देशनाबाबत मुद्दा क्र.८ मध्ये भरलेली माहिती अंतिम राहील.
९. नमुना ५-अ मध्ये निवृत्तिवेतनधारक हयात असताना त्यांच्या कुटुंबाची माहिती व कागदपत्रे एकत्रित घेण्यात येत असल्याने त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कुटुंब निवृत्तिवेतनाचे लाभ वेळेवर मिळण्यास मदत होणार आहे. यास्तव सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांनी सदरील फॉर्म अचूक व परिपूर्ण भरणेबाबत दक्षता घ्यावी.
१०. नमुना ५-अ सोबत निवृत्तिवेतन आज्ञावलीमध्ये अपलोड करावयाची कागदपत्रे तसेच नमुना ५-अ सोबत जोडावयाच्या कागदपत्रांची यादी -
1. निवृत्तिवेतनधारक, कुटुंब निवृत्तिवेतनधारकाचे यांचे संयुक्त छायाचित्र (Joint Photograph), निवृत्तिवेतनधारक अविवाहित असल्यास अथवा कुटुंब निवृत्तिवेतनधारक हयात नसल्यास अशा प्रकरणी एकल छायाचित्र (Single Photograph) अथवा निवृत्तिवेतनधारक विवाहित असूनही संयुक्त छायाचित्र देण्यास असमर्थता दर्शविल्यास कारणे नमूद करावीत.
॥. निवृत्तिवेतनधारक, कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांची नमुना स्वाक्षरी २ प्रतीत
iii. सेवापुस्तकाच्या प्रथम पृष्ठाची छायांकित प्रत
iv. निवृत्तिवेतनधारकाच्या हाताच्या अंगठा व बोटांचे ठसे जर शासकीय कर्मचाऱ्यास स्वाक्षरी करता येत नसेल तर नमुना स्वाक्षरीऐवजी कागदपत्रावर डाव्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा उमटवणे व कार्यालय प्रमुखाने साक्षांकित करणे आवश्यक आहे.
v. निवृत्तिवेतनधारक यांचे पॅनकार्ड स्व-साक्षांकित छायांकित प्रत
vi. बैंक पासबुकच्या प्रथम पृष्ठाची स्व-साक्षांकित छायांकित प्रत
vii. निवृत्तिवेतनधारक व कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांचे आधारकार्ड स्व-साक्षांकित छायांकित प्रत
viii. संयुक्त निवृत्तिवेतन खाते (Joint Account) असल्यास अशा प्रकरणी साध्या पेपरवर प्रतिज्ञापत्र
ix. जर कुटुंबातील सदस्य अल्पवयीन असेल किंवा मानसिकदृष्ट्या अपंग असेल तर जन्मदाखला व वैद्यकीय प्रमाणपत्र
११. ऑनलाईन फॉर्म भरुन झाल्यानंतर संबंधित सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी यांनी सदरील फॉर्मची Print व आवश्यक सहपत्रे ते सेवानिवृत्त होत आहेत / झाले आहेत, त्या कार्यालयास सादर करावीत.
१२. उपरोक्त नमुना ५-अ मध्ये प्राप्त झालेली माहिती कार्यालय प्रमुख यांनी पडताळणी करावी व तद्नंतर निवृत्तिवेतन आज्ञावलीमध्ये निवृत्तिवेतन प्रकरण ऑनलाईन तयार करण्याबाबत कार्यवाही करावी.
१३. शासन निर्णय दि.०२.०७.२०१५ च्या शासन निर्णयासोबत असलेला परिशिष्ट-अ (निवृत्तिवेतन प्रणालीमध्ये भरण्यात आलेल्या माहितीचा फॉर्म) Print करुन त्यावर निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांची स्वाक्षरी घेणे आवश्यक आहे.
१४. अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई अथवा कोषागार कार्यालयाकडून नियमित निवृत्तिवेतन सुरु झाल्यानंतर आवश्यक माहितीमध्ये बदल करावयाचा असल्यास संबंधित निवृत्तिवेतनधारक यांनी अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई अथवा कोषागार कार्यालयाकडे रितसर आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावा.
१५. महालेखापाल कार्यालयास कार्यालय प्रमुखाकडून मूळ सेवापुस्तक, नमुना ५-अ, सहपत्रे, निवृत्तिवेतन प्रणालीमधील परिशिष्ट-अ व इतर कागदपत्रे यांची तपासणी करुन निवृत्तिवेतन प्रकरण मंजूर करून अचूक e-PPO, e-GPO, e-CPO तयार करणेबाबत कार्यवाही करावी.
१६. संबंधित कार्यालय प्रमुखांनी अचूक माहिती सादर केलेली नसल्यास अथवा दिलेल्या माहितीमध्ये दुरुस्ती असल्यास अशी प्रकरणे ऑनलाईन रिजेक्ट करण्याची सुविधा महालेखापाल कार्यालय यांना उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
१७. अंतिम मंजूर करण्यात आलेल्या प्रकरणी नमुना ५-अ, परिशिष्ट-अ, e-PPO, e-GPO, e-CPO निवृत्तिवेतन वाहिनीमध्ये निवृत्तिवेतनधारक यांना कोषागार स्तरावर निवृत्तिवेतन सुरु करताना निवृत्तिवेतनवाहिनी प्रणालीमधील लॉगीनमध्ये (आहरण व संवितरण अधिकारी, महालेखापाल कार्यालय, कोषागार कार्यालय, निवृत्तिवेतनधारकाच्या वैयक्तिक लॉगीनमध्ये) उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
१८. भविष्यात कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना कुटुंब निवृत्तिवेतन सुरु करताना सदरील दस्तऐवज पुरावा म्हणून ग्राह्य करण्यात येईल. तसेच कोषागार स्तरावर कुटुंब निवृत्तिवेतन सुरु करताना कुटुंबातील सदस्यांमध्ये वादविवाद असल्यास अथवा न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास अशा प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयानंतर कुटुंब निवृत्तिवेतन सुरु करणेबाबत कार्यवाही करण्यात येईल.
संपूर्ण शासन आदेश परिशिष्टांसह पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


0 Comments