महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन विभागाने दिनांक 21 मार्च 2025 रोजी उष्णतेच्या नाट्य संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केले आहे त्या पुढील प्रमाणे.
उष्णतेच्या लाटेच्या प्रभावास प्रतिसाद
देण्यासाठी मार्गदर्शक सूचना
राज्यातील विविध जिल्ह्यात दरवर्षी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवतो. उष्णतेच्या लाटांमुळे आरोग्यविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची संभावना लक्षात घेता, जिल्हा स्तरावरून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभाग, महानगरपालिका / नगरपालिका व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी करावयाच्या योजनासाठी खालील मार्गदर्शक सूचनांचा वापर करावा.
१. महानगरपालिका/परिषद
बाजार, प्रमुख कार्यालये, बस स्टैंड, टॅक्सी स्टँड, रिक्षा स्टैंड इत्यादी सार्वजनिक ठिकाणी पुरेशी सावलीची व्यवस्था करावी तसेच सदर ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करावी (पंखा/कुलर इ. नादुरुस्त असल्यास दुरुस्त करावे)
सार्वजनिक ठिकाणी उष्णतेच्या लाटेशी संबंधित घ्यावयाची काळजी, संदर्भात पोस्टर्स /बॅनर्स लावावेत.
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी प्रथमोपचार पेट्या ठेवाव्यात आणि त्याच्या वापराबाबत आवश्यक सूचना लिहाव्यात.
टॅक्सी स्टैंड, बस स्टैंड (सरकारी/खाजगी), बाजार क्षेत्र आणि सरकारी कार्यालये या सार्वजनिक ठिकाणी पिण्याचे थंड पाणी उपलब्ध करावे.
महानगरपालिका आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शॉपिंग मॉल्स मध्ये ग्राहकांसाठी आणि बाहेरील लोकांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा करावी. तसेच बाहेरील लोकांना पाण्याच्या उपलब्धतेबद्दल माहिती देण्यासाठी मार्गदर्शक फलक ठेवावे.
उपलब्ध असल्यास रस्त्यावर पाणी शिंपडावे.
सर्व उद्याने दुपारी १२:०० ते दुपारी ४:०० वेळेत खुली ठेवावीत.
२. आरोग्य विभाग
उष्णतेच्या लाटेशी संबंधित आजार निरीक्षण आणि अहवाल तयार करणेसाठी नोडल अधिकारी नियुक्त करावे.
प्रत्येक आरोग्य केंद्राच्या परिसरात उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्या संबंधित माहिती फलक लावावेत.
उष्माघाताच्या रुग्णांसाठी आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र वैद्यकीय वॉडांची व्यवस्था करावी.
उष्माघाताच्या रूग्णांच्या उपचारासाठी जलद प्रतिसाद टीम (RRT) तयार करावी. बहुउद्देशीय कामगार, आशा वर्कर्स यांना उष्माघाताच्या रुग्णांचे उपचार आणि तपशील गोळा करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. उपलब्ध माहिती तालुका आरोग्य आधिकारी यांच्याकडे पाठवावी.
रुग्णवाहिका सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः दुपारी तत्पर ठेवावी.
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHCs) आणि इतर स्थानिक रुग्णालयांमध्ये ORS पावडरसह आवश्यक वैद्यकीय सुविधा यांचा साठा पुरेसा ठेवावा.
लहान मुले, अपंग व्यक्ती, स्त्रिया, वृद्ध लोक आणि मजूर यांसारख्या असुरक्षित गटांसाठी विशेष काळजी घेण्याची व्यवस्था करावी.
उष्माघाताशी संबंधित प्रकरणे आणि मृत्यूचे दैनिक अहवाल करावे.
ज्या कार्यक्रमांमध्ये जेवण दिले जाणार आहे, अशा कार्यक्रमांच्या आयोजकांसाठी आरोग्य विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य करावी.
३. पंचायत विभाग
पंचायत स्तरावर जागरूकता आणि उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्याच्या उपायांचा प्रसार करावा.
मनरेगा कामगारांच्या कामाचे तासांचे नियोजन करा आणि कामाच्या ठिकाणी सावली आणि थंड पाणी द्यावे.
उष्णतेच्या सतर्कतेच्या वेळी निवाऱ्याची सोय करावी आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता ठेवावी.
आरोग्य विभागाशी समन्वय साधा आणि ब्लॉक स्तरावर प्रशिक्षण सत्र आयोजित करावे,
उष्णतेच्या लाटेबाबत जनजागृतीसाठी ग्रामसभेचा प्रभावी माध्यम म्हणून वापर करण्यात यावा.
४. शिक्षण विभाग (प्राथमिक आणि माध्यमिक)
हवामान खात्याकडून आलेल्या चेतावणींनुसार शाळा/महाविद्यालयांचा वेळा नियोजन करा आणि थंड वर्गखोल्या, प्रथमोपचार आणि पिण्याच्या पाण्याची सोय करावी.
शाळेच्या वेळांमध्ये बदल करून उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीनुसार सुट्टी देण्यात याव्या.
उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी मैदानी / शारीरिक हालचाली टाळाव्यात. बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत.
दुपारच्या सत्रात मैदानावरील खेळांचे नियोजन करू नका.
विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करा आणि आपत्कालीन सेवांचा संपर्क द्या.
परीक्षा सकाळच्या सत्रातच घेतल्या जव्यात.
पंखे सुस्थितीत राहतील याची खात्री करावी.
माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत मुलांना सरबत, ताक आणि ORS पॅकेट द्यावे.
५. कामगार विभाग
कामगारांवर उष्णतेच्या लहरींचा प्रभाव कमी करण्यासाठी वेळोवेळी सूचना द्या आणि आवश्यक सुविधा द्याव्या.
कामगारांचे कामाच्या तासांचे नियोजन करा आणि कामाच्या ठिकाणी सावली आणि थंड पाणी उपलब्ध करून द्यावा,
कामगारांना उष्माघात प्रथमोपचार आणि CPR प्रशिक्षण द्यावे.
६. परिवहन विभाग
कमाल उष्णतेच्या लाटे दरम्यान सार्वजनिक वाहतुकीच्या सेवा सुरळीत राहील आणि प्रतीक्षा क्षेत्रावर सावली, पाणी आणि पंखे याची सोय करावी.
वाहनांवर खबरदारीचे उपाय दाखवा आणि प्रवाशांना माहितीपत्रक वितरित करावे.
दुरचित्रफीत, IEC प्रसारित करण्यासाठी बसस्थानके इत्यादीचा सार्वजनिक संबोधन प्रणालीचा वापर करावा.
उन्हाळ्यात सर्व बसेसमध्ये प्रथमोपचार किट (ORS च्या मुबलक साठ्यासह) असल्याची खात्री करावी.
बस स्थानकावर पाण्याची सोय, पंखे सुस्थितीत असावे.
७. वन विभाग
वन्य प्राणी आणि पक्ष्यांसाठी पुरेसे वृक्षारोपण आणि पाण्याचा पुरवठा असावा.
आग रोखण्यासाठी वनक्षेत्रांचे निरीक्षण करा आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय करावे.
८. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची सुविधा करावी आणि बोअरहोल आणि तलावांची तातडीने दुरुस्ती करावी.
उन्हाळी हंगामापूर्वी सर्व प्रकारच्या जलस्रोतांचे तपासणी आणि देखभाल करावी.
सकाळी किंवा संध्याकाळी पाणी पुरवठ्याच्या वेळेचे नियोजन करावे. या सूचना विशेषतः सार्वजनिक पाण्याच्या वापरा संदर्भात ग्राम पंचायत स्तरावर देण्यात याव्यात.
९. सार्वजनिक बांधकाम विभाग
सरकारी इमारती आणि संस्थांमध्ये कूल रूफ पेंटच्या वापराबद्दल प्रचार करावा.
बांधकामाच्या ठिकाणी मजुरांसाठी निवारा आणि प्रथमोपचार किट उपलब्ध करावे.
१०. ऊर्जा विभाग
उष्णतेच्या लाटांमध्ये वीजपुरवठा अखंडित राहावा यासाठी सर्व उपाय योजना करण्यात याव्या.
वीज बिलांवर उष्णता लहरीशी संबंधित IEC सामग्री प्रसारित करावी किंवा वीज बिलांसह IEC-संबंधित माहितीपत्रक वितरित करावे.
११. कृषी विभाग
उष्णतेमुळे पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.
शेतकऱ्यांपर्यंत हवामानाची माहिती प्रसारित करण्यासाठी "शेतकरी मित्र" यांचा वापर करावा.
शेत तलावांच्या देखभालीसाठी किंवा निर्मितीला प्रोत्साहन द्यावे. शेतीवर आधारित उपजीविकेसाठी पाण्याची उपलब्धते संदर्भात नियोजन करावे.
१२. पोलीस विभाग
पोलिसांसाठी सिग्नलवर निवारा किंवा बूथ उभारणी करावी.
पोलीस स्टेशन आणि ट्रॅफिक बूथवर प्रथमोपचार किट उपलब्ध करावे.
प्रत्येक पोलिस स्टेशनवर एका पोलिस कर्मचाऱ्यासाठी उष्माघात प्रथमोपचार आणि CPR प्रशिक्षण आयोजित करावे.
दुपारी आयोजित केलेल्या ओपन टू स्काय कार्यक्रमांना परवानगी पत्र देऊ नका.
कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात मुबलक पाण्याची व्यवस्था तसेच जागेच्या उपलब्धते प्रमाणे कार्यक्रमांना परवानगी द्यावी.
हवामान खात्याकडून आलेल्या चेतावर्णीनुसार उष्मालाट असलेल्या दिवशी मोठ्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये.
१३. महिला व बाल विकास विभाग
आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका यांच्यासाठी उष्माघात प्रथमोपचार आणि CPR प्रशिक्षण आयोजित करावी.
ICDS योजनेंतर्गत, सरबत, ताक आणि ORS पॅकेट मुलांना आणि गरोदर आणि स्तनदा महिलांना द्यावे.
ग्रामपंचायत स्तरावर उष्णतेच्या लाटेबाबत आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविकांद्वारे द्वारे जागरूकता निर्माण करावी.
१४. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)
सर्व उद्योगांनी मजुरांना पुरेसा निवारा आणि थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
सर्व सुरक्षा अधिकाऱ्यांना उष्माघात प्रथमोपचार आणि CPR प्रशिक्षण द्या. उष्णतेच्या लाटेपासून
बचाव संबंधित फलक प्रत्येक उद्योगाच्या बाहेर लावावेत.
उद्योगाच्या नियोजन आरखड्यात आपत्कालीन योजनेमध्ये उष्मा लहरी सज्जतेचा अध्याय समाविष्ट करावा,
ओद्योगीक क्षेत्रात वेळोवेळी आगीच्या घटना घडतात त्यामुळे पुरेशा सुविधा पाण्याचा साठा तसेच फोम टेंडर ची सुविधा ठेवावी.
१५. पशुधन विभाग
उष्णतेच्या लाटेत स्थानिक लोकांना प्राण्यांची काळजी घेण्यासाठी फलक आणि माहितीपत्रक तयार करावी.
प्राणी संरक्षणासाठी जागरूकता कार्यक्रम आयोजित करा आणि पशुवैद्यकीय औषधांचा पुरेसा साठा ठेवावा आणि जनावरांसाठी पाण्याची व निवाऱ्याची सोय करावी.
मोठ्या संख्येने पशुधन असलेल्या क्षेत्रात हिरवा चारा आणि थंड पाण्याची उपलब्धता करावी.
१६. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
• जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक सर्वसमावेशक "उष्णतेची लाट कृती आराखडा", व मानक कार्यप्रणाली (SoPs) आणि घटना प्रतिसाद प्रणाली (IRS) विकसित करावी. ज्यामध्ये लोकांच्या जीवनावर आणि उपजीविकेवर उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी विविध जिल्हा भागधारकांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात.
• जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने उष्णतेच्या लाटेच्या संदर्भात जिल्हा स्तरावर उष्मालाट नोडल अधिकारी नियुक्त करावा.
वृद्ध लोकसंख्येसाठी छत्री, पादत्राणे आणि कापसाचे टॉवेल स्वेच्छेने देणगी देण्यासाठी एनजीओ, सीएसओ आणि सीएसआरकडे संपर्क साधावा.
सामाजिक माध्यमातून IEC साहित्य प्रसारित करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाचा वापर करावा.
अति उष्णतेच्या लाटेसाठी हवामान बदल आणि मानवी आरोग्यावरील राष्ट्रीय कार्यक्रम
(NPCCHH) यांचा सार्वजनिक आरोग्य सल्ला
सामान्य लोकांसाठी
'हे' करा
> जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्या, तुम्हाला तहान लागली नसली तरीही. तहान हे निर्जलीकरणाचे चांगले सूचक नाही.
> प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
> ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन (ORS) वापरा आणि लिंबू पाणी, ताक/लस्सी आणि फळांचे रस यांसारखे घरगुती पेये प्यावे.
> टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्या.
> पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे.
> तुमचे डोके झाकून ठेवाः थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापरावे.
> उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालाव्यात.
➤ रेडिओ, टीव्ही वर प्रसारित होणाऱ्या उष्णतेच्या लाटेबाबत बचाव उपायावर लक्ष द्या आणि स्थानिक हवामान बातम्यांसाठी वर्तमानपत्र वाचावीत.
> भारतीय हवामान विभागाच्या (IMD) वेबसाइट https://mausam.imd.gov.in/वर हवामानाविषयी अद्ययावत माहिती घेत रहावे.
> हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालवा.
> थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटा रोखाः दिवसा खिडक्या आणि पडदे बंद ठेवावे, विशेषतः तुमच्या घराच्या सूर्यप्रकाशाच्या बाजूला. थंड हवा येण्यासाठी त्यांना रात्री खिडक्या उघड्या कराव्यात.
> जर तुम्ही घराबाहेर जात असाल, तर तुमची घराबाहेरील कामे दिवसाच्या सकाळ आणि संध्याकाळ वेळेपर्यंत मर्यादित करावी.
> दिवसाच्या थंड वेळांमध्ये बाहेरील कामांचे नियोजन करावे.
संवेदनशील किंवा जास्त जोखीम असलेल्या लोकांसाठी
> जरी कोणालाही उष्णतेचा ताण आणि उष्णतेशी संबंधित आजाराचा त्रास होऊ शकतो, तरीही काही लोकांना इतरांपेक्षा जास्त धोका असतो आणि त्यांच्याकडे अतिरिक्त लक्ष द्यावे.
> समाविष्ट घटक
* लहान अर्भक आणि लहान मुले
* घराबाहेर काम करणारे लोक
* गर्भवती महिला
* ज्यांना मानसिक आजारपण असेलेल व्यक्ती
> शारीरिकदृष्ट्या आजारी, विशेषतः हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब
➤ थंड हवामानापासून ते उष्ण हवामानापर्यंतच्या प्रवाश्यांनी त्यांच्या शरीराला उष्णतेला अनुकूल होण्यासाठी एक आठवडा वेळ द्यावा, जास्त श्रम टाळावेत आणि भरपूर पाणी प्यावे.
इतर खबरदारी
एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी व्यक्तींवर देखरेख ठेवली पाहिजे आणि त्यांच्या आरोग्याचे दररोज निरीक्षण केले पाहिजे.
तुमचे घर थंड ठेवा; पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडा.
दिवसा खालच्या मजल्यावर राहण्याचा प्रयत्न करावा.
शरीर थंड करण्यासाठी पंखा, स्प्रे बाटल्या, ओलसर कापड आणि बर्फाचे टॉवेल वापरावा.
पाण्यात पाय बुडवल्याने निर्जलीकरण आणि शरीराची उष्णतेमुळे होणारी अस्वस्थता कमी होऊन जलद थंडावा मिळतो.
'हे' करू नका
उन्हात बाहेर पडणे टाळा, विशेषतः दुपारी १२:०० ते ०३:००.
दुपारच्या वेळी बाहेर असताना कठोर परिश्रम टाळा.
अनवाणी बाहेर जाऊ नका.
अति उष्णवेळेत स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाक क्षेत्र पुरेशा प्रमाणात हवा येणासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स किंवा मोठ्या प्रमाणात साखर असलेले पेय टाळा - कारण यामुळे शरीरातील जास्त पाणी कमी होते किंवा पोटात पेटके येऊ शकतात.
• उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.
• उभ्या केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका. वाहनातील तापमान धोकादायक ठरू शकते.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments