कोविड काळा नंतरच्या शाळा आणि शिक्षण (विद्यार्थी, शिक्षक, शाळा व पालकांना उद्भवलेल्या समस्या आणि त्यावरील उपाय.)

 कोविड काळा नंतरच्या शाळा आणि शिक्षण... 

विद्यार्थी, शिक्षक, शाळा व पालकांना उद्भवलेल्या समस्या आणि त्यावरील उपाय.


        ज्या गोष्टीची कधी कल्पना देखील केली नव्हती अशा बऱ्याच  गोष्टी कोवीड महामारी मुळे आपण सर्वांनी अनुभवल्या, त्यामध्ये एवढे दिवस कधी शाळा बंद राहील याचा विचारही या अगोदर आपण केला नव्हता जवळपास दोन वर्ष शाळा बंद होत्या आणि शाळा बंद राहतील याची कल्पनाही कुणी केली नव्हती, त्यामुळे अतिशय वेगळी परिस्थिती पालक, विद्यार्थी, शाळा, शिक्षक या सर्वां पुढे येऊन ठाकली होती.

         शाळा बंद असल्यामुळे मोठ्या विद्यार्थ्यांनी कसेबसे ऑनलाईन ऑफलाईन पालकांच्या मदतीने स्वयंअध्ययन या वेगवेगळ्या माध्यमातून आपले शिक्षण सुरू ठेवण्याचा कसाबसा प्रयत्न केला.परंतु जी विद्यार्थी प्राथमिक शाळेत होते ज्यांचे प्राथमिक शिक्षण सुरू होते.  काही विद्यार्थी पूर्वप्राथमिक शाळेत होते. काहींना प्रवेश घ्यायचा होता. अशा विद्यार्थ्यांसाठी शाळा खुली नव्हती आणि शाळा खुली नसल्यामुळे तसे विद्यार्थी शिक्षणापासून बराच वेळ दूर राहिले आणि काही तर अक्षरश: वंचित राहिले. त्यातल्या त्यात खेड्यापाड्यातील प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवी इयत्तेत शिकत असलेली मुलं यांची परिस्थिती ही अतिशय केविलवाणी झाली. जो विद्यार्थी पहिल्या वर्गात होता आणि नुकताच शाळेत आला होता. त्याचे शिक्षक त्याचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु अर्ध्यातच शाळा बंद झाल्या दोन वर्ष तो विद्यार्थी घरी राहिला आणि पहिल्या वर्गातला विद्यार्थी डायरेक्ट तिसऱ्या वर्गात किंवा चौथ्या वर्गात पोहोचला. आता ज्या विद्यार्थ्यांनी घरी पालकांच्या मदतीने ऑनलाइन काहीतरी थोडाफार अभ्यास केला त्यांची परिस्थिती ठीक आहे. परंतु अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी शाळा नाही तर अभ्यास नाही अशी भूमिका स्वीकारली अशा विद्यार्थ्यांना जरी ते चौथ्या वर्गात असले तरी त्यांना अक्षर ओळख अंकज्ञान प्राथमिक गणितीय क्रिया या पुन्हा शिकवाव्या लागतील असे वाटते.

जे विद्यार्थी पाचवी किंवा त्यापुढच्या वर्गात होती त्या विद्यार्थ्यांनी पालकांना त्यांच्या व्यवसायात शेतीत शाळा बंद असताना मदत केली. आता शाळा सुरू होऊनही एक तर ते विद्यार्थी शाळेत यायला तयार नाहीत किंवा त्यांचे पालक त्यांना शाळेत पाठवायला तयार नाहीत.अशी परिस्थिती काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत झाली आहे. मग या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काय? हे विद्यार्थी परत शाळेत येतील की नाही याबाबत मनात शंका आहे. 

अशा वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या स्तरावर शाळा बंद असल्यामुळे निर्माण झाले आहे. ह्या समस्या आपण विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शाळा अशा एक एक करून पाहूया आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम विद्यार्थी जो शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे त्याच्या समस्यांबद्दल आणि त्यावरील उपायांबद्दल आपण विचार करूया.

१) विद्यार्थ्यांच्या समस्या:-

१) दोन वर्षे शाळा बंद होती त्यामुळे शाळेत बसण्याची सवय राहिली नाही.

२) कुठे बाहेरही पडू शकत नसल्यामुळे फक्त घरात बसून टीव्ही पाहणे मोबाईल पाहणे व खेळणे यासारख्या सवयी लागल्या.

३) काही मुले चिडचिडी बनली काही मुलांचं मानसिक आरोग्य खराब झालं.

४) नियमित अभ्यासाची सवय राहिली नाही.

५) शाळेमुळे तयार झालेली वेळापत्रक पाळणे सवयीची राहिले नाही मनात वाटेल तेव्हा वाटेल ती गोष्ट करणे याची सवय मुलांना झाली.

६) बऱ्याच मुलांची एकाग्रता कमी झाली. जास्त वेळ एका ठिकाणी बसून अभ्यास करणे त्यांच्या सवयीचे राहिले नाही.

७) अभ्यासाच्या बरेच गोष्टी विद्यार्थी विसरल्या सारखी झाली त्यांना त्या आठवत नाही. त्यामुळे त्यांना त्या परत परत आठवण करून द्यावे लागतात शिकाव्या लागतात.

8)पालक बाहेरगावी गेल्यामुळे त्याला स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढले व विद्यार्थी उपस्थिती कमी झाली.

9)वरच्या वर्गातील विद्यार्थी खूप दिवस शाळेबाहेर राहिल्यामुळे कुठल्यातरी कामात मी पण झाले त्यापासून त्यांना उत्पन्न देखील मिळायला लागले त्यामुळे त्यांना शाळेत येण्यात रस राहिला नाही.

10) शाळा बंद असल्यामुळे वरच्यावरच्या म्हणजेच पाचवी सहावी पेक्षा पुढील वर्गातील खेड्यापाड्यातील विद्यार्थिनी या त्यांच्या घरी घरकामात मदत करू लागल्या त्यामुळे घरी त्यांची उपयुक्तता जास्त आहे असा पालकांचा समज झाला त्यामुळे अशा काही विद्यार्थिनींना पालक शाळेत परत पाठवायला तयार नाही.

11) नववी दहावीच्या पुढील विद्यार्थिनींची विशेषतः खेड्यापाड्यातील अल्पवयीन विद्यार्थिनींची काही पालकांनी चुपचाप लग्न उरकून टाकली हे काळातील भयानक वास्तव वास्तव आहे हे आपण मान्य करायला पाहिजे.


विद्यार्थ्यांच्या समस्या वरील उपाय

1) शाळेतील तासिका सुरवातीला कमी वेळाच्या ठेवणे व नंतर  हळू हळू वाढवत नेने.

२) शाळेत सुरवातीला वेळापत्रक थोडे शिथिल ठेवणे खेळणे क्रुतीयुक्त शिक्षण अशा गोष्टी ज्यामुळे विद्यार्थी शाळेत रमातील अशा गोष्टी घ्याव्या लागतील.. 

3)विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेऊन त्या पद्धती ने अध्यापन करणे गरज भासल्यास विद्यार्थ्यांसाठी मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणे.

4)हळूहळू थोडा थोडा अभ्यास करण्याची सुरूवातीला सवय लावणे व नंतर नियमित अभ्यास देणे.

5)सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या कला नुसार अभ्यास घेणे व नंतर नियमित वेळापत्रकानुसार अध्यापन करणे

6)विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल अशी उपक्रम जसे की बैठे खेळ मनोरंजक पद्धतीचे अध्यापन अशा उपाययोजना करता येतील.

7) गरज भासल्यास मागील येतील अभ्यासक्रमाची गरजेनुसार उजळणी घेणे असे उपाय आपण करू शकतो.

8) स्थलांतरित पालकांकडे नियमित पाठपुरावा करून एक तर ज्या शाळेत आहे त्याच शाळेत विद्यार्थी कसा येईल यासाठी उपाय योजना करणे किंवा ज्या ठिकाणी पालक स्थलांतरित झाला आहे अशा ठिकाणच्या शाळेत विद्यार्थ्यांना प्रविष्ट करणे.

9) विद्यार्थी व पालक यांना प्रत्यक्ष भेटून शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे शिक्षण घेतल्यानंतर पुढे अजून यापेक्षा अधिक विद्यार्थी व पालकांचा कसा फायदा आहे हे त्यांना पटवून देणे व दोघांचेही समुपदेशन करणे.

10) मुलींच्या शिक्षणाचे महत्व पालकांना प्रत्यक्ष भेटून समजावून सांगणे त्यांचे समुपदेशन करणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे मुलगी शिकल्यानंतर आता जेवढी उपयोगी पडते त्यापेक्षा अधिक ती शिकल्यानंतर पालकांच्याही उपयोगी पडेल आणि तिचे स्वतःचे जीवनही अधिक सुसह्य होईल हे पालकांना पटवून देणे.

11) अल्पवयीन मुलींच्या लग्नामुळे त्यांच्या जीवनात होणारे बदल आणि दुष्परिणाम याची जाणीव पालकांना करून देते गरज भासल्यास अल्पवयीन मुलींचे लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे यांच जाणीव पालकांना करून देणे.

अशा प्रकारे विविध अशा समस्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत निरिक्षण केल्यास लक्षात आले आहे आणि त्यावरील उपाय देखील अधिक परिणामकारकपणे करणे गरजेचे आहे.

आता याच समस्या शिक्षकाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास... 


२) कोविड काळानंतर च्या शिक्षका समोर उद्भवलेल्या समस्या.. 

जे विद्यार्थी शिक्षकांच्या संपर्कात होते म्हणजेच ऑनलाइन क्लास करत होते किंवा त्यांच्या पालकांनी त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांचा अभ्यास पूर्ण करून घेतला होता असे विद्यार्थी अभ्यासात टिकून आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या संपर्कात न राहता ऑनलाईन ऑनलाईन क्लास न करता किंवा त्यांच्या पालकांना देखील त्यांना शिकवायला वेळ नव्हता त्यांचा अभ्यास करून घेणे याला वेळ नव्हता अशी जवळपास पन्नास टक्के विद्यार्थी आहेत आणि ती अभ्यासात मागे पडलेली आहे अशा विद्यार्थ्यांना अभ्यासात पुढे आणणे आणि जे विद्यार्थी संपर्कात होते अशाही विद्यार्थ्यांना एकाच वर्गात शिकवणे ही तारेवरची कसरत शिक्षकांच्या समोर आहे.

 Covid नंतर विद्यार्थी उपस्थिती कमी झाली आहे ते वाढवण्याचे आव्हान शिक्षकांसमोर आहे.

विद्यार्थ्यांची मानसिकता शाळेत टिकवून ठेवण्याचे आव्हान शिक्षका समोर आहे.

महामारी च्या काळात घरी बसून विद्यार्थ्यांना लागलेल्या सवयी शिक्षण प्रक्रियेत बाधा ठरणार नाही याची काळजी शिक्षकांना घ्यायची आहे.

विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय पुन्हा लागेल यासाठी देखील काही उपाययोजना शिक्षकाला करायच्या आहेत.

शाळेतील परिस्थितीशी वेळापत्रकाशी विद्यार्थ्यांना जुळवून घेण्यास मदतही शिक्षकांनाच करायची आहे.

विद्यार्थ्यांची एकाग्रता टिकून ठेवण्यासाठी काही ठोस उपाय योजना देखील शिक्षकांना करायच्या आहे.

मागील इयत्तेतील अभ्यास विद्यार्थी जर विसरले असतील तर त्याची पुन्हा उजळणी देखील शिक्षकांना घ्यायची आहे.

स्थलांतरित झालेल्या पालकांच्या मुलांना पुन्हा शाळेत कसे आणता येईल याबद्दल ठोस उपाय योजना देखील शिक्षकाला शाळेच्या मदतीने करायचे आहेत.

जे विद्यार्थी नियमित शाळेत येणे बंद झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शाळेत यायला प्रोत्साहित करण्याची जबाबदारी जबाबदारी देखील शिक्षकांवर आहे.

मुलींच्या बाबतीत विशेष लक्ष घालून मुली शाळेतून काढल्या जाऊ नयेत नियमित त्या शाळेत याव्यात यासाठी पालकांना मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन मुलींना शाळेत नियमित पाठवण्यासाठी प्रयत्न देखील शिक्षकांनाच करायचे आहेत.


महामारी च्या काळानंतर शिक्षकांसमोर उद्भवलेल्या समस्या वरील उपाय.. 

विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवताना शिक्षकांना नियोजनपूर्वक संयमाने काम करणे गरजेचे आहे.

गरज भासल्यास जे विद्यार्थी अभ्यासात अतिशय मागे पडले आहेत त्यांची निदानात्मक चाचणी घेऊन त्यानुसार उपचारात्मक अध्यापन करण्यासाठी वेगळा वेळ राखीव ठेवावा लागेल जे विद्यार्थी प्रवाहात टिकून आहे. आणि ज्या इयत्तेत ते आहे त्या त्या वर्गाचं त्यांना शिकवणे ही गरजेचे आहे.

विद्यार्थी उपस्थिती वाढवण्यासाठी नियमित पालक संपर्क, काही मनोरंजक पद्धतीचा वापर करून अध्यापन, अगोदर कमी परंतु मनोरंजक गृहपाठ देऊन हळूहळू विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करण्याची सवय लावण्याची गरज आहे.

थोडी वेळापत्रकामध्ये लवचिकता बाळगून विद्यार्थ्यांच्या कलाने अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक मनोरंजक कशी होईल ज्यामुळे विद्यार्थी शाळेत येणे टाळणार नाही अशा उपाययोजना करणे ही गरजेचे आहे.

शाळेत असलेले खेळ साहित्य वापरून विविध खेळांसाठी सुरुवातीला कमीत कमी एक तासिका जर राखीव ठेवली तर खेळात रसद असलेले विद्यार्थी देखील शाळेत येतील आणि टिकतील या दृष्टीने विचार करून उपाययोजना कराव्या लागतील.

जे महत्त्वाचे घटक पुढील शिकवण्यासाठी आवश्यक आहेत अशा घटकांची उजळणी तो घटक सुरू करण्याअगोदर घेता येईल म्हणजे संपूर्ण उजळणी न घेता वेळ वाचेल व समोरील शिक्षणही सुरू राहील.

गरज भासल्यास अगोदरच्या इयत्तेतील संपूर्ण घटकांची उजळणी देखील घेण्याचे नियोजन शिक्षकांना करावे लागेल अशावेळी ज्या विद्यार्थ्यांना मागील इयत्तेची उजळणी घेण्याची गरज नाही असे विद्यार्थी व ज्यांना गरज आहे असे विद्यार्थी असे दोन वेगळे गट करून अध्यापन करणे सुलभ जाईल.

जे विद्यार्थी शाळेत येणे बंद झाले आहे, अशा विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करण्यासाठी समुपदेशकाची भूमिका देखील शिक्षकाला बजावावी लागेल.

मुलींच्या बाबतीत विद्यार्थिनींचे आई-वडील दोघांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे.

अशा पद्धतीने वरील उपाय योजना आपण करू शकतो स्थानिक परिस्थितीनुसार या उपाययोजनांचा वापर आपल्याला करता येईल.

महामारी च्या काळानंतर शाळांसमोरील समस्या.. 

पालकांची स्थलांतरण, व्यवसाय बदल, रोजगार जाणे, पालकांनी शाळेत जाणे योग्य असलेल्या विद्यार्थ्यालाही शाळेत दाखल न करणे यामुळे अनेक विद्यार्थी शाळाबाह्य किंवा स्थलांतरित झाली आहेत. 

शाळा सुरू नाही म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे नाही म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्याची देखील गरज नाही आणि दाखल असलेल्या विद्यार्थ्यांची शाळेची फी भरण्याची गरज नाही, ऑफलाईन शाळेपेक्षा कमी फी शाळेने आकारावी अशा अपेक्षा, यावरील उपाय म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेतच घालायचे नाही त्यामुळे त्यांचे पैसे वाचतील अशी विचारसरणी, शाळा सुरू नसल्यामुळे जास्त शुल्क आकारणाऱ्या शाळांमधून कमी शुल्क असलेल्या शाळांमध्ये किंवा शासकीय शाळांमध्ये जेथे शुल्क देण्याची गरज नाही किंवा अत्यल्प शुल्क देण्याची गरज आहे अशा शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश करणे, अशा अनेक समस्या शाळा व शैक्षणिक संस्था यांच्यासमोर महामारी नंतर उद्भवलेल्या आहेत.

खाजगी शाळांना नियमित शुल्क महामारी च्या काळात मिळाला नाही त्यामुळे कार्यरत शिक्षक आणि कर्मचारी यांचे वेतन देखील काही खाजगी शाळा देऊ शकल्या नाही मग अशा कर्मचारी किंवा शिक्षकांना वेगळे उत्पन्नाचे साधन शोधायला भाग पडले व ते ती शैक्षणिक संस्था सोडून गेले म्हणजे पुन्हा शिक्षक व कर्मचारी नेमण्याची गरज अशा शाळा व शैक्षणिक संस्थांना पडली.

एका वर्गात कमी विद्यार्थी बसवायचे असल्यामुळे वर्गखोल्या कमी  पडत आहेत.

मास सॅनिटायझर थर्मामीटर हॅन्ड वॉश स्टेशन याबाबतचा अधिकचा खर्च शैक्षणिक संस्थांना करावा लागत आहे.


महामारी च्या काळानंतर शैक्षणिक संस्था समोरील समस्यांवरील उपाय

कुठल्याही परिस्थितीत शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हा एक महत्वाचा उपाय ठरू शकेल. यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षक व कर्मचारीवर्ग योग्य त्या वेतनावर नेमावा लागेल.

स्थलांतरित झालेल्या पालकांच्या विद्यार्थ्यांना आरटीई 2009 नुसार प्रवेश नाकारता येणार नाही त्यांच्याकडे बाकी असलेले शुल्क काही टप्प्यात भरण्याची सवलत त्यांना देता येऊ शकते ज्यांना शक्यच नाही अशांकडून कमीत कमी शुल्क आकारता येईल. 

कोणताही विद्यार्थी शालाबाह्य होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना शैक्षणिक संस्था व शाळा यांनी करणे गरजेचे आहे.


महामारी नंतर पालकांच्या समोरील समस्या.. 

बरेच दिवस शाळा बंद असल्यामुळे काही विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी नाही म्हणतात त्यांना शाळेत पाठवणे ही पालकांची यांच्यासाठी डोकेदुखीची बाब ठरते.

परिस्थिती बदलल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे की नाही अशी द्विधा मनस्थिती काही पालकांची तयार झाली आहे त्यांना शाळेत आपल्या पाल्याची योग्य काळजी घेतली जाईल की नाही याबद्दल शंका आहे.

शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची झालेली शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी पालकांना घरी देखील त्यांचा अभ्यास पूर्ण करण्याची जबाबदारी घेऊन अधिकचा वेळ पाल्यांसाठी काढावा लागत आहे.

महामारी च्या काळात बरेच या पालकांचा रोजगार कमी झाल्यामुळे अथवा रोजगार गेल्यामुळे स्थलांतरण करावे लागले आहे अशावेळी मधातच विद्यार्थ्यांच्या शाळा बदलाव्या लागल्या विद्यार्थ्यांच्या शाळांचं शुल्क कसं भरायचं ही समस्या पालकांसमोर उभी राहिली.

विद्यार्थ्यांसाठी शाळा निवडीचे निकष आता पालकांना बदलावे लागले आणि योग्य शाळा शोधणे हे पालकं समोरील आव्हान ठरले आहे. 


महामारी नंतर पालकांच्या समस्यांवरील उपाय

विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेऊन त्यांच्याशी योग्य पद्धतीने वर्तन करणे त्यांचं शिक्षकांच्या मदतीने किंवा तज्ञ व्यक्तीच्या मदतीने समुपदेशन करून शाळेत जाण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे.

शाळेत दिल्याशिवाय विद्यार्थी शिकणार नाही हे समजून घेणे व शाळेत गेल्यानंतर कोणती काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी हे त्यांना समजून सांगणे हा उपाय करणे गरजेचे आहे.

जर आपल्या पाल्याची आपणास काळजी आहे तर त्यांना थोडा जास्त वेळ देऊन मागे पडलेला अभ्यास त्यांच्याकडून करून घेणे ही पालक व शिक्षक यांची जबाबदारी आहे हे पालकांनी समजून घेणे.

जरी आपला रोजगार कमी झाला असेल पुरेसे पैसे उपलब्ध नसतील तरी आपल्या पाल्याचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी त्यांना योग्य ते शिक्षण देणे गरजेचे आहे ही बाब पालकांनी समजून घेणे गरजेचे आहे.

शाळा निवडत असताना खूप जास्त गोष्टींचा विचार न करता शाळेतील शिक्षक वर्ग किती चांगला आहे आणि शाळेत कोणता अभ्यासक्रम किती चांगल्या पद्धतीने शिकवला जातो याचा विचार करून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेऊन देता येईल.


अशा प्रकारची महत्त्वाची शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी गुगल सर्च करा www.pradipjadhao.com ला.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी भेट द्या आमच्या पुढील यूट्यूब चैनल ला.

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 

आपलाच

 प्रदिप जाधव 

राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.